डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्व निळजे भागातील लोढा हेवन मधील सुमारे ३० हजार रहिवाशांना कल्याण-डोंबिवली महापालिका पाणीपुरवठा करण्यास तयार असून एमआयडीसीने इथली पाणीपुरवठा यंत्रणा महापालिकेकडे हस्तांतरीत करावी, ही कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी मान्य झाली असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीला तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे इथल्या हजारो रहिवाशांची एमआयडीसीच्या महागड्या पाण्याच्या कचाट्यातून सुटका झाली आहे.कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध मागण्यांसदर्भात खा. डॉ. शिंदे यांनी मंगळवारी देसाई यांची मंत्रालयात भेट घेतली. २७ गावांतील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाबरोबरच निळजे येथील लोढा हेवनमधील सुमारे ३० हजार रहिवाशांना चढ्या दराने मिळणाऱ्या पाण्याचा प्रश्नही खा. डॉ. शिंदे यांनी उपस्थित केला. पूर्वी हा परिसर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्राबाहेर असल्यामुळे या गृहनिर्माण संस्थेला एमआयडीसी मार्फत पाणी पुरवठा केला जातो. या पाण्याचे दर १६ रुपये ते १०.२५ रुपये प्रति हजार लिटर असे असून ते येथील नागरिकांना परवडणारे नसल्याची बाबा खा. डॉ. शिंदे यांनी निदर्शनास आणली.यापूर्वी देखील हा प्रश्न आपण मांडला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. एमआयडीसीच्या पाइपलाइनची यंत्रणा वापरून कल्याण-डोंबिवली महापालिका या गृहसंकुलांना पाणीपुरवठा करण्यास तयार असल्याचेही खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.याला सकारात्मक प्रतिसाद देत देसाई यांनी पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला परवानगी देण्याचे आदेश एमआयडीसीला दिले. त्यामुळे नागरिकांची चढ्या दराच्या कचाट्यातून मुक्तता झाली आहे.
३० हजार रहिवाशांना कल्याण-डोंबिवली महापालिका पाणीपुरवठा करण्यास तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 5:28 PM