डोंबिवली, दि. 19 - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सभेस आयुक्त पी. वेलरासू हे अनुपस्थित राहिल्याने सदस्यांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली. महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सदस्यांच्या मागणीनुसार सभा तहकूब केली आहे. मात्र तहकूब सभा पुन्हा कधी घेतली जाणार याची तारीख त्यांनी जाहिर केलेली नाही.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खडय़ांचा प्रश्न गाजत आहेत. तांत्रिकदृष्टया महापालिका हद्दीत असलेल्या कल्याण खंबाळपाडा रस्त्यावर ललित संघवी या व्यापा-याचा रस्त्यावरील खड्डय़ामुळे मृत्यू झाला. या प्रकरणी व्यापारी वर्गाने मोर्चा एमआयडीसीवर मोर्चा काढला होता. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने 12 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
प्रत्यक्षात पावसाळ्य़ापूर्वी, पावसाळ्य़ानंतर, गणपती पूर्वी आणि नवरात्री पूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविलेले नाहीत. खडय़ांचा प्रश्न गाजतो. या प्रकरणी सभा तहकूबी मांडण्यात आली होती. मोठा गाव ठाकूर्ली माणकोली पूलाचे काम रखडलेले आहे. याविषयी शिवसेना सदस्य दीपेश म्हात्रे यांनी सभा तहकूबी होती.
त्याचबरोबर आर्थिक तरतूदीपेक्षा जास्त कामे महापालिकेने हाती घेतल्याने आर्थिक व विकास कामांचे नियोजन फसले आहे. याविषयी महापालिका आयुक्तांनी एक श्वेत पत्रिका काढावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांनी मागणी केली होती. इतक्या महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आयुक्त सभेला हजर नसतील तर सदस्यांनी सांगितले की, आम्हाला चर्चाच करायची नाही. सभा तहकूब करा अशी मागणी केली. सभा आयोजित करुन उपस्थित राहत नसलेल्या आयुक्तांच्या गैरहजेरीविषयी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 11 वाजता आयुक्त खासदारांच्या बैठकीस उपस्थित होते. मात्र त्यांच्या चर्चेपश्चात त्यांनी सभेला अनुपस्थीत राहणो कितपत योग्य आहे असाही सूर काही सदस्यांनी व्यक्त केला.
सभेला अतिरिक्त आयुक्त संजय घरत हे उपस्थित असल्याने सभा चालवू या असे आवाहन महापौरांनी सदस्यांना केले. आयुक्त एका न्यायालयीन सुनावणीसाठी गेले असल्याचे महापौरांनी सभागृहास सांगितले. त्यावर प्रशासनाकडून ही माहिती का दिली जात नाही. महापौर आयुक्त सांगून जातात. एक प्रकारे ते महासभेचा अवमान करीत असल्याचा मुद्दा सदस्यांनी मांडला. अतिरिक्त आयुक्त हे सभा चालविण्यास सक्षम नाही असा सदस्यांचा मुद्दा नसून ते सगळ्य़ा गोष्टीसाठी सक्षम आहे. मात्र आम्हाला आयुक्तांकडून रस्ते खड्डे व श्वेतपत्रिकेवर खुलासा हवा आहे. महापौरांनी केलेल्या आवाहनाला सदस्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे महापौरांनी सभा तहकूब केली.