कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. नाईक यांना मानणारे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मोठा वर्ग कल्याण-डोंबिवली शहरांतही आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत कोण राहतो आणि कोण नाईक यांना साथ देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, नाईक समर्थक पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी सोडल्याचे दिसून आले नाही. त्यावर कल्याण-डोंबिवलीतील राष्ट्रवादीत आलबेल आहे, असा दावा स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे.
नाईक हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात महिनाभर सुरू होती. त्यांचे पुत्र संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी जेव्हा राजीनामा दिला, तेव्हा कल्याण-डोंबिवलीतील गणेश नाईक यांच्या समर्थकांनी मात्र ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली होती. त्यादरम्यान गणेश नाईक यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नव्हती. त्यामुळे नाईक काय निर्णय घेतात, यावर आमचा निर्णय ठरेल, असा पवित्रा समर्थकांनी घेतला होता. जिल्ह्याचे नेते म्हणून गणेश नाईक जेव्हा भाजपमध्ये प्रवेश करतील, तेव्हा राष्ट्रवादीतील आगरी समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देतील, अशीही जोरदार चर्चा होती. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु, बुधवारी मात्र नाईक समर्थक पदाधिकारी असो अथवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतच राहणार असल्याची भूमिका ‘लोकमत’कडे मांडली. नवी मुंबईचे राजकारण वेगळे आहे. कल्याण-डोंबिवलीत तशी स्थिती नाही, असे मत एका समर्थक कार्यकर्त्याने व्यक्त केले. तर, नाईक यांचे कट्टर समर्थक , कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व कल्याण ग्रामीणचे स्थानिक नेते डॉ. वंडार पाटील यांनीही मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगितले.कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या विचारसरणीचाकल्याण-डोंबिवलीतील कार्यकर्ता हा शरद पवार तसेच राष्ट्रवादीच्या विचारसरणीचा आहे. भाजपची विचारसरणी आमच्या पक्षातील कार्यकर्त्याला कधीच पटणारी नाही. पवारांनी अनेकांना नेतृत्वाची संधी दिली, पण आज जे पक्ष सोडून चालले आहेत, ते भाजपच्या पे्रमापोटी जातात, असे नाही. कोणावर दबाव आहे, लोभ आहे, याभूमिकेतून जात आहे.आमच्या पक्षातील क ार्यकर्ते पुन्हा जिद्दीने कामाला लागू. ती सुरुवात आम्ही केलेली आहे. त्यामुळे कार्यकर्ते अथवा पदाधिकारी येथून भाजपमध्ये गेलेले नाहीत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी ‘लोकमत’कडे मांडले. तर, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनीही पक्षात स्थानिक पातळीवर सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले.