कल्याण : ठाणे शहर पोलिसांच्या परिमंडळ-३, कल्याणअंतर्गत येणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील चार विधानसभा मतदारसंघांत सोमवारी मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुमारे अडीच हजार पोलीस सज्ज आहेत. त्यात स्थानिक पोलिसांबरोबरच नागलॅण्ड आणि आसाम येथून आलेल्या सेंट्रल मिलिटरी फोर्सची तुकडी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआरएसएफ) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) समावेश आहे.
कल्याण परिमंडळात दोन पोलीस उपायुक्त, सात सहायक पोलीस आयुक्त, २५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक, ८० सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, १८०० पोलीस कर्मचारी आणि ३०० होमगार्ड, असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतदानासाठी नेमलेल्या पोलिसांनी मागील दोन ते तीन दिवसांत शहरातील २२ ठिकाणी रूट मार्च केले. त्यात पहिल्यांदाच राज्याबाहेरील फोर्सचा समावेश होता. दरम्यान, मतदारांनी पूर्णपणे मोकळ्या वातावरणात व निर्भयपणे मतदानाचा अधिकार बजावावा. मतदानासाठी पोलीस विभाग संपूर्णपणे सजग आणि दक्ष आहे, असे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.
प्रतिबंधात्मक कारवाई
कल्याण परिमंडळ-३ अंतर्गत असलेल्या आठ पोलीस ठाण्यांत करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत ४० जणांना तडीपार केले आहे. तर, जवळपास ८०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.