मुरलीधर भवार कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांमधील रस्त्यांवरील खड्ड्यांचे वाहनचालकांच्या मार्गातील विघ्न कायम आहे. खड्डे बुजवण्याबाबत लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मौन धरले आहे. कर व टोल भरा, पण खड्डे बुजवण्याविषयी विचारू नका, या प्रशासनाच्या ढिम्म भूमिकेमुळे नागरिक खड्ड्यांच्या त्रासातून सुटका होणार तरी कधी, असा संतप्त सवाल करत आहेत.
शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजविले जावे हा विषय महापालिकेच्या स्थायी समितीत लवकर मार्गी लावावा यासाठी त्याला मंजुरी दिली गेली. दरम्यान, एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आड आली होती. निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करून खड्ड्यांप्रकरणी स्थायी समितीची सभा घेण्यास मुभा देण्यात आली. हा विषय मे महिन्यात मंजूर झाला होता, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवले जाणे अपेक्षित होते. पावसाळा उशिराने सुरू झाला. त्यात २६ जुलै, ४ आॅगस्ट यादरम्यान अतिवृष्टी झाली. सगळीकडे पूरस्थिती होती. त्यामुळे रस्त्यांची अवस्था आणखीन बिकट झाली. काही ठिकाणी रस्तेच वाहून गेले. पावसाळ्यात हा विषय गाजत असतानाच कल्याण पत्रीपुलावर खड्ड्यामुळे अरुण महाजन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाला जाग येणे अपेक्षित होते. भिवंडी-कल्याण-शीळ हा रस्ता राज्य रस्ते विकास महामंडळाकडे आहे. या रस्त्यावर महामंडळाने नियुक्त केलेली टोल कंपनी जड वाहनांकडून टोल वसूल करत आहे. मात्र, रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. शहरात महापालिकेचे आणि महामंडळाचे रस्तेदुरुस्ती पथक पावसाळ्यात फिरताना दिसून आले. त्यानंतर कोणत्या रस्त्यावरील किती खड्डे बुजवले याचा तपशील काही उघड करण्यात आला नाही. कल्याण पत्रीपुलावर खड्डे असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे. कल्याण सूचनाका येथे मोठ्या खड्ड्यांत पेव्हरब्लॉक टाकण्यात आल्याने रस्ता उंच-सखल झाल्यामुळे तेथे गाडी जवळपास एक फूट खड्ड्यात आदळत आहे. कल्याण बैल बाजार ते शिवाजी चौकादरम्यानही मोठमोठे खड्डे असून ते भरले गेलेले नाहीत. कल्याण पश्चिमेतील आयुक्त बंगला ते बिर्ला कॉलेजकडे जाणाºया रस्त्यावर खड्डे आहेत. पावसाळ्यात पावसाचा जोर जास्त असल्याने खड्डे बुजवता येत नव्हते. त्यामुळे तेथे सिमेंटमिश्रित खडी टाकण्यात आली होती. ही खडी इतरत्र पसरली जाऊन वाहने स्लीप होण्याच्या घटना घडत आहेत.
गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिले होेते. गणपतीचे आगमन आणि विसर्जन खड्डेमय रस्त्यातून झाले. गणपती गेल्यावर नवरात्रीच्या आधी खड्डे बुजवले जाणे अपेक्षित होते. नवरात्र संपली, दसरा झाला तरी रस्त्यावरील खड्डे कायमच आहेत. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून आचारसंहितेचे कारण सांगत खड्डे बुजवता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. निवडणुकीत कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघास डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्ड्यांचा विषय मनसेतर्फे लावून धरला. तोच प्रचाराचा मुद्दाही केला. तसेच पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी डोंबिवली-कल्याणच्या सभेत रस्त्यावरील खड्डे या विषयावर प्रकाश टाकला होता. मुख्यमंत्री व आदित्य ठाकरे यांच्या आगमनापूर्वी काही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचा केविलवाणा फार्स प्रशासनाने केला.खड्ड्यांचा त्रास केव्हा संपणार : नागरिकांचा संतापखड्ड्यांतूनच उमेदवारांनी निवडणूक प्रचार केला. दिवाळीही खड्ड्यांतच गेल्याने पालिकेने नेमलेल्या कंत्राटदारांनी कोणत्या रस्त्यांवरील खड्डे बुजवले, असा संतप्त सवालही नागरिक करत आहेत.प्रशासन आणि कंत्राटदाराचे साटेलोटे असल्याने जनतेला खड्ड्यांत जाऊ द्या. आपल्याला त्याचे काय, अशी प्रशासनाची भूमिका दिसून येत आहे.नव्याने निवडून आलेले आमदार आता तरी खड्डे बुजवण्याविषयी प्रशासनाला धारेवर धरून खड्डे बुजवण्यास भाग पाडणार आहेत की नाही, असा सवाल केला जात आहे.