कल्याण : पूर्वेतील चिंचपाडा रोडवरील केडीएमसीच्या ड प्रभाग कार्यालयाच्या बाजूला असलेल्या गणपती मंदिराच्या उघड्या मंडपातून १० किलो वजनाची पिवळ्या धातूची घंटा चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी मंदिरातील पुजारी दिवाकर तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------------------------------
मोबाइल लंपास
कल्याण : चंद्रशेखर चौहान आणि त्याचा मित्र संतोष सरोज हे शुक्रवारी मध्यरात्री चिंचपाडा रोडवरील तबेल्याच्या जवळ उघड्यावर झोपले असताना, त्यांचे मोबाइल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------------------------------
दुचाकीची चोरी
कल्याण : नितीन तलरेजा यांची दुचाकी चोरीला गेल्याची घटना गुरुवारी सकाळी १० ते रात्री १० दरम्यान पश्चिमेतील डी मार्टच्या बाजूला दीपज्योती बिल्डिंगसमोर घडली. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नितीन यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीचोराच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------------------------
स्पीच अँड हेअरिंग
कल्याण : अपंग विकास महासंघ आणि अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हेअरिंग डिसॲबिलिटीज दिव्यांगजन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पीच अँड हेअरिंग मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन गुरुवारी २५ आणि शुक्रवारी २६ मार्चला करण्यात आले आहे. पश्चिमेतील आग्रा रोडवरील शिवसृष्टी बिल्डिंगमध्ये सकाळी १० वाजल्यापासून हे शिबिर सुरू होणार आहे.
---------------------------------------------------
केडीएमसी हद्दीत कोरोनाचे नवे ४०४ रुग्ण
कल्याण : केडीएमसी परिक्षेत्रात कोरोना रुग्णांमध्ये दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रविवारी तब्बल ४०४ नव्या रुग्णांची भर पडली, तर २४९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. २४ तासांत तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवली पूर्व आणि कल्याण पश्चिमेत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. आतापर्यंत मनपाच्या हद्दीत एकूण ६६ हजार ९३७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील ६२ हजार ७०३ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,२१४ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ३,०४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
---------------------------------------------------
फ्री मेडिकल चेकअप
कल्याण : कल्याण-डोंबिवली जिल्हा युवक काँग्रेस यांच्या वतीने रविवारी फ्री मेडिकल चेकअप शिबिराचे आयोजन पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवरील इंदिरानगरमध्ये करण्यात आले होते. माजी आमदार संजय दत्त आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाने, तसेच ब्रिजकिशोर दत्त आणि मनीष देसले आदी पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने कल्याण पश्चिम विधानसभा उपाध्यक्ष फिरोज शेख यांनी हे आयोजन केले होते. याला चांगला प्रतिसाद लाभला.