कल्याण : माधुरी घुगे या विवाहितेचा भेटवस्तू दिल्या नाहीत म्हणून शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पती प्रशांत, सासू जिजा, नणंद वर्षा सांगळे आणि मनीषा कांगणे आदी चौघांविरोधात येथील खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माधुरीने विषारी औषध प्राशन केल्याने त्यात तिचा मृत्यू झाला. तिचा भाऊ कृष्णा आव्हाड यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
-----------------------------------------------
गोमांस हस्तगत
डोंबिवली : मालेगाववरून गोमांस मुंबईला विक्रीसाठी नेणाऱ्या वाहनचालकाला रविवारी दुपारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून मानपाडा पोलिसांच्या हवाली केले. कल्याण-शीळ मार्गावर काटई नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गोमांस विक्रीसाठी नेणाऱ्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
------------------------------
चित्रकला स्पर्धा संपन्न
कल्याण : द शील संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी पूर्वेतील सूचकनाका येथील महात्मा फुले नगरमध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेत ३० ते ४० मुलांनी सहभाग घेतला होता. यात पहिला क्रमांक अविनाश धुबाळे, दुसरा क्रमांक सुधीर जयस्वाल आणि तिसरा क्रमांक मुकेश जयस्वाल यांनी पटकाविला. तसेच निबंध स्पर्धेत पहिला क्रमांक सपना कुशवहा, दुसरा क्रमांक स्नेहा यादव यांनी तर तिसरा क्रमांक मानसी कदम यांनी पटकाविला.
------------------------------------------------------