ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १३ - कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना - भाजपाची युती दुभंगली असून दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून शिवसेना सर्व १२२ जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता असून भाजपा आणि रिपाइंची युती होण्याची चिन्हे आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना - भाजपाची युती असून विधानसभा निवडणुकीनंतर मात्र शहरातील चित्र बदलले आहे. डोंबिवली व कल्याण पश्चिमेत भाजपाचा आमदार असून कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड हेदेखील भाजपाच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत बाजी मारण्याचे स्वप्न भाजपाच्या स्थानिक नेत्यांना पडू लागली आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोंबिवलीतील विकास परिषदेत सहभागी झाले होते व या परिषदेत त्यांनी शहरासाठी पॅकेजचीही घोषणा केला होती.
युतीसाठी दोन्ही पक्षाचे नेते अनुत्सुक होते. भाजपानेही यंदा जास्त जागा मागितल्याने शिवसेना नेत्यांची यासाठी तयारी नव्हती. अखेरीस सोमवारी रात्री दोन्ही पक्षांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना - भाजपा युतीतील संबंध कमालीचे ताणले असून मुंबईत विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी नरेंद्र मोदी मुंबईत असताना या कार्यक्रमाकडे शिवसेनेने पाठ फिरवली होती. उद्धव ठाकरेंना उशीराने निमंत्रण दिल्याने शिवसेनेत नाराजी होती. तसेच खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या मुद्द्यावरुनही शिवसेना व भाजपा आमनेसामने उभे ठाकले होते.