डोंबिवली/कल्याण : एखाद्या शहरात संमेलन झाले म्हणजे ते वाङ्मयदृष्ट्या सकस झाले असे नव्हे, असा टोला लगावत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांंच्या अध्यक्षतेखालील समितीने शुक्रवारी साहित्य संमेलनासाठी डोंबिवली आणि कल्याण या स्थळांची पाहणी केली. एकाच मनपातील या दोन्ही संस्थांनी स्वतंत्र संमेलनासाठी हट्ट धरल्याने या पाहणीनंतर अखेर समितीला सीमाप्रश्नामुळे गाजणारे बेळगाव गाठावे लागले. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीच्या काळात होणाऱ्या या संमेलनाच्या स्थळाचा फैसला येत्या रविवारी होणार आहे. ते भाजपाच्या प्रभावाखालील क्षेत्रात असेल की शिवसेनेच्या, याचे गुपितही त्याच दिवशी उलगडेल.डोंबिवलीतील आगरी युथ फोरम आणि कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाने अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी निमंत्रण दिले होते. ही दोन्ही शहरे एका महापालिकेच्या हद्दीत असल्याने दोन्ही प्रस्ताव एकत्र करून संयुक्तपणे आयोजन करावे, असे मत मांडून काहींनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, त्याला फारसे महत्त्व न देता दोन्ही आयोजक संस्थांनी आपलाच हट्ट कायम ठेवल्याने साहित्य महामंडळाच्या समितीने दोन्ही शहरांतील जमेच्या आाणि उणिवेच्या बाजू समजून घेतल्या. आयोजकांचेच एकमत नसल्याने पाहणीनंतर अखेर त्यांनी बेळगावच्या दिशेने मोर्चा वळवला. वस्तुत: संमेलनासाठी निमंत्रण दिलेल्या संस्थांत फारशी मोठी शहरे नसल्याने डोंबिवली-कल्याण या शहरांचे पारडे जड होते; परंतु आपल्याच हट्टावर आयोजक ठाम राहिल्याने समितीला बेळगावचीही पाहणी करावी लागली. (प्रतिनिधी)कळीचे मुद्दे कोणते?साहित्यिकांची निवासव्यवस्था, साहित्य रसिकांसाठी निवासाचा मुद्दा, पुस्तक प्रदर्शनासाठी प्रकाशकांना पुरेशी जागा, पार्किंगची व्यवस्था, प्रसाधनगृहे, रस्त्यांतील खड्डे असे वेगळे कळीचे मुद्दे या पाहणीवेळी समोर आले.वस्तुत: महापौर हे पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शहरांचे प्रथम नागरिक असतात. पण, मूळचे कल्याणकर असलेल्या राजेंद्र देवळेकर यांनी संमेलनस्थळांच्या पाहणीवेळी डोंबिवलीतील बैठकीला दांडी मारून कल्याणच्या बैठकीला हजेरी लावली. पालिकेच्या अर्थसंकल्पातील तरतूद ही एकाच शहरासाठी असल्याप्रमाणे त्यांनी समितीसमोर सादरीकरण केले. त्यांनी फक्त कल्याण शहराची बाजू उचलून धरल्याने डोंबिवलीच्या साहित्यप्रेमींत नाराजी पसरली. समिती-आयोजकांत कोण? : महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, भालचंद्र जोशी, विलास देशपांडे, सुधाकर भाले, दादा गोरे, उज्ज्वला मेहंदळे आणि प्रकाश पायगुडे, इंद्रजित बोडके यांची टीम पाहणीसाठी आली होती. डोंबिवलीत आयोजक आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, गणेश मंदिर संस्थानचे अच्युत कऱ्हाडकर, नाट्य परिषदेच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष दिलीप गुजर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, सुरेश देशपांडे, शुक्राचार्य गायकवाड, डॉ. मीनाक्षी ब्रह्मे, भारती ताम्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सहकार्याचे पत्र पाठवले होते. कल्याणमध्ये आयोजक संस्था सार्वजनिक वाचनालयाचे राजीव जोशी, भिकू बारस्कर, प्रशांत मुल्हेरकर, कवी मकरंद वांगणेकर, साहित्यिक किरण जोगळेकर, बिल्डर संघटनेचे सदस्य मिलिंद कुलकर्णी, माजी शिक्षक आमदार प्रकाश संत, प्रा. जितेंद्र भामरे आदी उपस्थित होते. बेळगावचा सीमावाद भाजपाला अडचणीचाअवघ्या एका तपापूर्वी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळालेल्या बेळगावमध्ये संमेलन होणे भाजपाच्या दृष्टीने अडचणीचे आहे. यापूर्वीच्या भाजपा सरकारने केलेल्या अन्यायावर रान उठवण्याची आयती संधी त्यामुळे शिवसेनेला मिळेल आणि संमेलन सेना हायजॅक करेल, अशी भीती भाजपाच्या नेत्यांच्या मनात आहे. त्यातही, राज्यात मुंबई-ठाण्यासह १० महापालिकांच्या निवडणुकीचे वारे वाहत असताना भाषक अस्मितेचा मुद्दा आयता शिवसेनेच्या हाती जाईल आणि त्या मुद्द्यावर निवडणुकीत मराठी भाषकांचे राजकारण करणे, त्या पक्षाला सोयीचे होईल म्हणून बेळगावचा पर्याय पुढे येऊ नये, यासाठी भाजपाच्या नेत्यांनी आधीपासूनच मोर्चेबांधणी केली होती. पण भाजपाचे नेते, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बैठकीपासून अंतर राखल्याने आणि शिवसेनेचे नेते असलेले महापौर राजेंद्र देवळेकर यांनी एकाच शहराची बाजू उलचून धरल्याने भाजपाची पंचाईत झाली. त्यामुळे रविवारी नागपूर येथे होणाऱ्या बैठकीपूर्वी सूत्रे हलावी, यासाठी भाजपा नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
स्वतंत्र साहित्य संमेलनासाठी कल्याण, डोंबिवलीचा हट्ट
By admin | Published: September 17, 2016 1:59 AM