डोंबिवली: गेल्या आठवडाभरापासून कल्याणमधील नागरिक आधारवाडी डंम्पिंगमुळे हैराण असल्याने अधिवेशनात तो मुद्दा गाजला. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त पी.वेलरासू यांची बदली केली. वेलरासू यांच्याजागी एम.जी. बोडके यांची नवे आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
गुरुवारी मध्यरात्री उशिरापर्यंत वेलरासू सत्ताधा-यांसमवेत महापालिकेच्या बजेट संदर्भात कामात व्यस्त होते, आणि त्यात शुक्रवारी सकाळी सर्वप्रथम ‘लोकमत’ने वेलरासू यांची बदली झाल्याची माहिती दिल्याने सत्ताधा-यांसह सगळयांचीच तारांबळ उडाली. वर्षभरापूर्वी वेलरासू हे या महापालिकेत आयुक्त म्हणुन रुजु झाले होते, शुभारंभापासूनच त्यांना या ठिकाणी काम करण्यास स्वारस्य नसल्याची टिका सत्ताधारी शिवसेनेसह भाजपाने केली होती. म्हणुनच गेले वर्षभर या महापालिकेत कोणतीही विशेष विकासकामे झाली नाहीत. उलट या ठिकाणी घानेरडं शहर असा कलंक लावला गेल्याने सत्ताधा-यांवर विरोधकांनी टिकेची झोड उठवली होती. त्यातच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही घाणेरडे शहर म्हणून डोंबिवलीचा उल्लेख केला होता. त्यापाठोपाठ आधारवाडी डम्पिंगला लागलेली आग या सर्व घटनाक्रमांमुळे वेलरासू यांची बदली करावी अशी मागणी कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनी अधिवेशनात केली होती. अखेर झालेही तसेच शुक्रवारी सकाळीच वेलरासू यांची बदली झाल्याची ऑर्डर वा-यासारखी पसरली.
अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनी काढलेल्या आदेशाद्वारे वेलरासू यांची बदली करण्यात आली असून ते आता राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकी संचालक म्हणुन कारभार सांभाळणार असल्याचे त्या आदेशात नमूद केले आहे. तातडीच्या तत्वावर नवा पदभार स्विकारावा असेही त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.