कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या चिकणघर येथील नागरी आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉ. सीमा जाधव यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परतीच्या पावसाने अद्याप परतीची वाट न धरल्याने साथीच्या रोगांनी पुन्हा डोके वर काढले आहे. नागरी आरोग्य केंद्रातील साथ रोग नियंत्रणासाठी काम करीत असताना त्यांना डेंग्यूची लागण झाली आहे. महापालिकेच्या डॉक्टरलाच डेंग्यू झाला असताना महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य विभाग गाढ झोपेत आहे हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते व माजी महापौर रमेश जाधव यांची सीमा ही मुलगी आहे. सीमा यांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केल्याची बाब गटनेते जाधव यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत व वैद्यकीय अधिकारी स्मिता रोडे यांना कळवून देखील त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. साधी त्यांची चौकशी देखील केली नसल्याचा आरोप गटनेते जाधव यांनी केला आहे.
डॉ. सीमा या चिकणघर परिसरात साथ रोग नियंत्रणात तपासणीकरीता येणाऱ्या रुग्णांचे रक्ताचे नमुने घेण्याचे काम करीत होत्या. तीन दिवसापासून ताप असल्याने त्या आजारी पडल्या. हा ताप डेंग्यूचा असल्याने त्यांना तातडीने कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वीच महापालिकेच्या रुग्णालयातून योग्य उपचार मिळत नाही. डॉक्टर व स्टाफकडून हलगर्जीपणा केला जातो याविषयी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करुन रोडे यांच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या पश्चातही वैद्यकीय आरोग्य विभाग गाढ झोपेत असे दिसून येत आहे.
काही दिवसापूर्वी महापालिकेच्या लेखा विभागातील कार्यरत अधिकारी श्वेता सिंगासने यांचा डेंग्यूने मृत्यू झाला. हा मृत्यू महापालिका हद्दीत झाला नाही असे सांगून महापालिकेच्या आरोग्य विभागाने हात वर केले. मात्र ज्या दिवशी सिंगासने यांचा मृत्यू झाला. त्याच संध्याकाळी महापालिका मुख्यालयात धूर फवारणी करण्यात आली होती. महापालिकेच्या पूर्व भागात दूषित पाणी पुरवठा केला जातो. परतीचा पाऊस आणि दूषित पाणी पुरवठा यामुळे नागरीकांना साथीच्या रोगांची लागण होत असल्याचा दावा गटनेते जाधव यांनी केला आहे. महापालिका प्रशासनाकडे तक्रार करुन देखील त्याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नसल्याचे जाधव यांनी सांगितले.