कल्याण - येथील कोळसेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी एमडी ड्रग्सविरोधात मोठी कारवाई केली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी ड्रग्ज तस्कर नायजेरियन नागरिकासह दोन आरोपींना अटक केली, तर कल्याण खडकपाडा पोलिसांनी कल्याणजवळील आंबिवली इराणी वस्तीमधून एका महिला ड्रग्ज तस्कराला अटक केली. चार अटक आरोपींकडून पोलिसांनी सात लाख रुपये किमतीचे ३०० ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत केले.
चुकवुईमेका जोसेफ इमेका असे नायजेरियन ड्रग्ज तस्कराचे नाव आहे. तो नवी मुंबईतील राहणारा आहे. सुनील यादव, युवराज गुप्ता, इराणी महिला फाजी इराणी अशी इतर आरोपींची नावे आहेत. कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्वेकडील शंभर फुटीरोड येथे नाकाबंदी केली होती. या नाकाबंदीदरम्यान एका रिक्षामध्ये दोघे संशयास्पद आढळून आले. ऑटो रिक्षा ताब्यात घेत सुनील यादव, युवराज गुप्ता या दोन जणांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याजवळ एमडी ड्रग्ज आढळून आले.
तिघांकडून २८५ ग्रॅम ड्रग्ज जप्तचौकशीत दोघांनी नवी मुंबई येथील एक नायजेरियन नागरिक एमडी ड्रग्ज विकत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी नवी मुंबईतील चुकवुईमेका जोसेफ इमेका या तस्कराला बेड्या ठोकल्या. तिघांकडून पावणेसहा लाख किमतीचे सुमारे २८५ ग्रॅम ड्रग्ज जप्त केले. खडकपाड्याचे वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला आंबिवली इराणी वस्तीत गस्त घालत असताना फिजा इराणी ही महिला संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. झडतीत तिच्याकडे ६६ हजार रुपये किमतीचे ३४ ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. अशी माहिती कल्याणचे सहायक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.
मागील १५ दिवसांत कोळसेवाडी पोलिसांनी ७३ गांजा विक्रीचे गुन्हे दाखल करीत ५० हजारांचा गांजा जप्त केला. गांजा पिणाऱ्या दहा जणांविरोधात गुन्हे दाखल करून यात एकूण १३ आरोपींना अटक केली आहे.- महेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक