- मुरलीधर भवार
कल्याण - आज मराठी भाषा दिनानिमित्त शहाड येथील मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्यालयात मराठी विभाग आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने मधुसुदन चौक ते महाविद्यालया दरम्यान ग्रंथ दिंडी काढण्यात आली.
या ग्रंथ दिंडीत विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी पारंपरिक वेशभूषा करून उत्साहाने सहभागी झाले होते. पालखीमध्ये कुसुमाग्रज यांची प्रतिमा, संविधान ग्रंथ, ज्ञानेश्वरी, डॉ. गिरीश लटके लिखित के ४६ असे ग्रंथ ठेऊन टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत फुगड्या घालत त्यांची मिरणुक काढण्यात आली.
शहाड गावातील सर्व वारकरी आपल्या टाळ-मृदुंगासह सहभागी झाले. त्यामुळे मिरवणुकीला दिंडीचे स्वरूप आले. या ग्रंथ दिंडीत माजी नगरसेवक गणेश कोट, संस्थेचे सचिव डॉ. गिरीश लटके, प्राचार्य डॉ. अरुण देवरे आदी मान्यवर सहभागी झाले. सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा महाविद्यालया तर्फे शाल देऊन डॉ. लटके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ग्रंथ दिंडी कार्यक्रम समन्वयक डॉ. चिंतामण भोईर यांनी उपस्थितांचे आभार मानले.