- अनिकेत घमंडीडोंबिवली : सोमवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानकातून ११.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेली कसारा जलद लोकल मंगळवारी सकाळी १०.४० वाजता आपल्या नियोजित स्थळी तब्बल ११ तासानंतर पोहोचली. त्या लोकलचे गार्ड गोरख पाटील, मोटारमन आणि मोजकेच ३०० प्रवासी यांनी संपूर्ण रात्र कांजूरमार्ग ते माटुंगा दरम्यान रुळावर साचलेल्या पाच फूट पाण्यातून कूर्मगतीने प्रवास करीत काढली.रविवारी रात्री झालेल्या पावसाने सोमवारी दिवसभर चाकरमान्यांना एकतर लोकलमध्ये कैद केले किंवा रेल्वे मार्गातून तीन ते चार तास पायपीट करण्यास भाग पाडले. सोमवारी रात्री पुन्हा सुरु झालेल्या मुसळधार पावसाने लोकल सेवेची दाणादाण उडवली. जलद लोकलने कल्याण ते सीएसएमटी प्रवासासाठी एरव्ही एक ते सव्वा तास लागतो. पण कांजुरमार्ग, सायन मार्गावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या कल्याण ते सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या जलद लोकलला हे अंतर कापण्याकरिता तब्बल ११ तास लागले. या लोकलचे गार्ड गोरख पाटील यांनी सांगितले की, भांडूप ते कांजूर, घाटकोपर प्रवासासाठी दोन तास आणि पुढे घाटकोपर ते सायन प्रवासाठी पाच तास लागले. सोमवारची रात्र अजिबात विसरू शकत नाही. ११ तासांचा न संपणारा, कंटाळवाणा, जीवघेणा प्रवास कधीच विसरता येणार नाही. पाटील सोमवारी संध्याकाळी सीएसएमटी येथून ६.२५ वाजताची कसारा लोकल घेऊन कसारा स्थानकात रात्री ८.३० वाजता पोहोचले. त्यानंतर रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी ते लोकल घेऊन सीएसएमटीकडे निघाले. लोकल पावणे बाराच्या सुमारास कल्याणपर्यंत आली, परंतु त्यानंतर लोकल सर्वत्र रखडली. कल्याण ते ठाणे प्रवासासाठी रात्रीचे १२.२५ वाजले. मुलुंडनंतर लोकलच्या रांगा लागल्या होत्या. कासवगतीने लोकल पुढे सरकत होती, अर्धाअर्धा तास एका ठिकाणी उभी राहत होती. सतत हॉर्न दे, बेल दे यामुळे हातपाय दुखायला लागले होते. भांडुप ते घाटकोपर हे अंतर कापण्याकरिता मध्यरात्रीचे २.३५ वाजले. घाटकोपर स्थानकातून पहाटे ४.५० वाजता निघालेली लोकल सायन स्थानकात पोहोचायला सकाळचे १० वाजले होते. कांजुरमार्ग ते सायन हा अवघा १० ते १५ मिनिटांचा प्रवास पण पाणी रुळांवर साचल्याने ७ तास २५ मिनिटांचा वेळ लागला.आजुबाजूला प्रचंड पाणी, रात्रीचा मिट्ट अंधार अशा वातावरणात गार्ड केबिनमध्ये बसून रात्र काढावी लागली. त्या पाण्याच्या प्रवाहातून रात्रभर लोकल कशी चालवली असेल याची कल्पनाच करवत नाही, असे ते म्हणाले. सकाळ झाली, पुन्हा स्थानकावर नव्या दमाने नोकरीला जाण्याकरिता आलेल्यांची गर्दी झाली. आम्ही डोळ््याला डोळा न लावता रात्र पावसाच्या पूरात काढल्याची त्यांना कल्पनाही नसेल. अखेर सकाळी १० वाजता सायन स्थानक सोडले आणि लोकल १० वाजून ४० मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात पोहोचल्यानंतर पाटील यांची ड्युटी संपली.घडले माणुसकीचे दर्शनया कठीण प्रसंगातही घाटकोपर, कांजुर, सायन भागामध्ये जेथे लोकल थांबल्या त्या सर्व ठिकाणी आजूबाजूच्या मोजक्याच नागरिकांनी आस्थेने विचारपूस केली. काहींनी चहा, बिस्किटांची सोय केली. केवळ आम्हीच नाही तर अनेक स्थानकात अडकून पडलेल्यांची रात्र पावसा-पाण्यात गेली. पाटील यांनीही त्यांच्याजवळील खाद्यपदार्थ सहप्रवाशांना दिले.
कल्याण - मुंबई प्रवास ११ तासांचा, गार्ड गोरख पाटील यांचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 11:46 PM