कल्याण : केडीएमटी प्रशासनाने शनिवारपासून कल्याण-पनवेल बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज पाच बस धावणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.केडीएमटीने अनलॉकमध्ये कल्याण रिंगरूट दुर्गाडीमार्गे, रिंगरूट बिर्लामार्गे, मोहना कॉलनी, तर डोंबिवलीतील लोढा हेवन आणि निवासी भागासाठी बससेवा सुरू केली. त्यानंतर पुढच्या टप्प्यात भिवंडी, मलंगगड आणि उंबर्डे मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली. दरम्यान, पनवेल आणि नवी मुंबई या मार्गावर बस चालू कराव्यात, अशी प्रवाशांची मागणी सातत्याने होत होती. ती विचारात घेऊन पनवेल आणि नवी मुंबई या लांब पल्ल्यांच्या मार्गावरही बस चालू कराव्यात, यासंदर्भात सभापती मनोज चौधरी यांनी केडीएमसीचे आयुक्तडॉ. विजय सूर्यवंशी यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली होती.‘ठाण्यातही सेवा द्या’ठाणे आणि नवी मुंबईला कामासाठी जाणाऱ्यांची सध्या मोठी गैरसोय होत आहे. तेथे जाणारी वाहने कमी आणि नागरिकांची संख्या जास्त, असे चित्र असल्याने त्यांना तासन्तास ताटकळत राहावे लागत आहे. त्यासाठी या मार्गांवर तातडीने केडीएमटीची सेवा सुरू करण्याची मागणी मनसेने केली आहे. तसेच या गाड्या सुरू न झाल्यास मनसे स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे कल्याण शहर संघटक रूपेश भोईर यांनी दिला आहे.
कल्याण-पनवेल बससेवा शनिवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 1:16 AM