डोंबिवली - कल्याण डोंबिवली शहरातील जलद वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या काम बंद असलेल्या पत्री पुलाच्या बांधकामाची पाहणी शनिवारी आमदार नरेंद्र पवार यांनी केली. त्यावेळी महिना झाल्यानंतरही काम बंद का? असा सवाल पवार यांनी एमएसआरडीसीच्या अभियंत्यांना विचारला. त्यावर रेल्वे प्रशासनाकडून काही तांत्रिक परवानगी मिळण्यासाठी विलंब झाला आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम रखडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. त्यावर पवार यांनी तात्काळ खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधत लवकरच तोडगा काढला जाईल, पण कामाला सुरुवात करा काम बंद ठेवू नका असे स्पष्ट केले.
रेल्वेने सहकार्य केल्यास आगामी वर्षभरात पूल उभा राहण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी पवार यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत एमएसआरडीसीचे उपअभियंता अनिरुद्ध बोरडे, कंत्राटदार दीपक मंगल,सल्लागार एल.एन.मालविय उपस्थित होते. गेल्या महिन्यात १८ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेने ६ तासांचा पॉवर ब्लॉक वाहतुकीसाठी धोकादायक ठरलेला ब्रिटिशकालीन १०४ वर्षांचा जुना पत्री पुल पाडला. त्यानंतर या जागेवर नवा पुल अत्यंत जलद पणे उभारू असे आश्वासन एमएसआरडीसीने दिले होते. मात्र आता त्यास महिनाभर उलटून गेल्यानंतरही काम कुर्म गतीने सुरू असल्याचे आमदार पवार यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
पूल पाडल्याने वाहतूकीचा संपूर्ण भार हा बाजूलाच असणाऱ्या नव्या पुलावर येत आहे. तेथेही प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना कल्याण डोंबिवलीकरांना करावा लागतो. वारंवार विचारणा करूनही अधिकारी वर्ग नीट माहिती देत नसल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच थेट भेट देत सद्यपरिस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संबधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची सुटी असतानाही धावाधाव झाली. यापुढे रेल्वेकडून कसलाही विलंब होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. नागरिकांना होणारा त्रास आणि शहरातील वाहतूकीवर येणारा ताण लक्षात घेता सबंधित सर्व यंत्रणांनी नव्या पत्री पुलाच्या बांधकामाला गती देण्याची आवश्यकता असल्याचे पवार म्हणाले.