डोंबिवली- कल्याण रेल्वे स्थानकात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिला प्रवासी आणि एका मुलाचे प्राण रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचा-यांनी वाचवले. हवालदार किरण पवार आणि कृष्णाकुमार मीना अशी त्या देवदूत कर्मचा-यांची नावे आहेत. २१ व १६ डिसेंबर रोजी दोन्ही घटना घडल्या असून विशेष म्हणजे त्या उद्यान एक्स्प्रेसमध्ये चढतानाच झाल्या आहेत. घटनेची ही दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत.
२१ डिसेंबर रोजी कल्याण रेल्वे स्थानकात कृष्णाकुमार मीना हे कार्यरत होते. कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक-५ वर मुंबईहून बंगळूरुला जाणारी उद्यान एक्स्प्रेस उशिराने धावत असल्याने प्रवाशांची फलाटावर गर्दी जमली होती. कृष्णाकुमार मीना हे त्या वेळी फलाटावर गस्त घालण्याचे काम करत होते. सकाळी ९ वाजताच्या सुमारास उद्यान एक्स्प्रेस फलाटावर येताच प्रवाशांची गाडी पकडण्यासाठी एकच झुंबड उडाली. या प्रवाशांमध्ये एक महिला होती. तिच्या लहान मुलाला घेऊन गाडीमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असताना ती महिला मुलासह फलाट आणि गाडीच्या गॅपमधील जागेत पडली. त्याच वेळी कर्तव्यावरील कृष्णाकुमार मीना यांनी तिला वर उचलून तिला वर खेचले.
तर दुस-या एका घटनेत १६ डिसेंबर रोजी रेल्वे सुरक्षा दलाचे किरण पवार हे कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ४ वर कार्यरत होते. मुंबईवरून बंगळुरूला जाणारी उद्यान एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाटावर आली.गाडी फलाटावर येताच अनेक प्रवासी चालत्या गाडीत चढले. याच प्रवासांमध्ये एक महिला आणि दोन मुले असे एक कुटुंब होते.गाडीत चढण्याच्या प्रयत्नात या कुटुंबातील एका मुलीचा पाय घसरला आणि त्यामुळे ती आणि तिची आई अडखळून खाली कोसळली. मुलीने कसेबसे स्वतला सावरले आणि ती गाडीत शिरली.परंतु याच अपघातात तिच्या आईच्या शरीराचा अर्धा भाग फलाट आणि गाडी यांच्यातील मोकळ्या जागेत गेला. या वेळी पवार या प्रवाशांच्या मदतीला धावून गेले. तातडीने त्यांनी त्या महिलेला खेचून फटीतून बाहेर काढले आणि जीवितहानी टळली. या दोही घटना वेगवगेळया असल्या तरी त्यात प्रवाशांचे जीव वाचल्याने रेल्वे पोलिस दलाच्या पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.