- मुरलीधर भवार
कल्याण - कल्याण बस डेपोचे इन आऊट गेट काल बंद करण्यात आल्याने त्याला रिक्षा चालकांनी विरोध केला. त्याठिकाणी काही वेळ रिक्षा चालकांनी रिक्षांचा बंद पाळत निषेध व्यक्त केला. यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर यानी धाव घेतली. तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त मंदार धर्माधिकारी यांची भेट घेऊन हे बस डेपोचे इन आऊट गेट त्वरीत सुरु करण्याची मागणी केली.
स्टेशन परिसर विकासाचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु आहे. या कामाला गती देण्यासाठी डिसेंबर २०२२ मध्ये वाहतूकीत बदल केला होता. हा बदल मार्च महिन्यापर्यंत राहिल असे सांगण्यात आले होते. मात्र स्टेशन परिसरातून रिक्षा स्ट’ण्ड हलविले गेले नव्हते. मार्च महिन्यापर्यंत स्टेशन परिसराचे कामाला गतीन देऊन ते पूर्ण करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले होते. मात्र डेपोच्या इमारतीच्या विकासाची एनआेसीच एसडी महामंडळाकडून उशिरा प्राप्त झाली. त्यामुळे वाहतूक सुरळित ठेवून स्टेशन परिसरातील काम करण्यासाठी कंत्राटदार कंपनीला अडथळ्यांच्या शर्यतीचा सामना करावा लागला. आत्ता स्मार्ट सिटीच्या सगळ्या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने जून २०२४ ही डेडलाईन दिली आहे. त्यामुळे महापालिकेने आत्ता कल्याण बस डेपो विठ्ठलवाडी बस डेपोच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
आयुक्तांनी हा निर्णय घेतला असला ती त्याला एसटी महामंडळ व्यवस्थापकांकडून अद्याप होकार मिळालेला नाही. अशा परिस्थितीत बस डेपोचे इन आऊट गेट बंद करण्यात आले. या गेट बंदीमुळे रिक्षा चालाकांना प्रवासी भाडे मिळत नाही. प्रवासी भाडे मिळण्यात अडचणी येत असल्याने रिक्षा चालकांनी गेट बंद करण्यास विरोध केला. रिक्षा चालकांच्याच्या बाजूने संघटनेने धाव घेऊन ही बाब सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाला रिक्षा चालकांचा विरोध नाही. सहकार्य करण्याची भूमिका आहे. मात्र प्रवासी भाडयावर गदा येणार असेल तर त्याला विरोध केला गेला असे रिक्षा चालकांच्या वतीने सांगण्यात आले.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी काही अंशी स्टेशन परिसरातील वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे. काही मार्ग हे एकेरी वाहतूकीसाठी केले जाणार आहेत. यासंदर्भात रिक्षा चालक संघटनेच्या सोबत बैठक घेऊन वाहतूकीतील बदलाच्या विषयी चर्चा केली जाणार आहे असे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गिरीष बने यांनी सांगितले. येत्या दोनच दिवसा ही बैठक घेतली जाणार आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी जितेंद्र पवार,संतोष नवले, सगीर शेख, भारत धनगर, अमजद पठाण, नसिम खान, विजय डफळ, संजय बागवे, याकुब कुरेशी आदी उपस्थित होते.