कल्याण : डोंबिवलीतील फेरीवाल्यांवर केडीएमसीकडून कारवाई होत नसल्याचा मुद्दा २० जूनच्या महासभेत चांगलाच गाजला होता. या वेळी नगरसेवकांच्या मागणीवरून महापौर राजेंद्र देवळेकर यांनी डोंबिवलीतील फेरीवाले व अतिक्रमणविरोधी विभागाचे पथकप्रमुख संजय कुमावत यांची दोन दिवसांत बदली करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला चार महिन्यांनंतर मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे महासभेचे आदेश कितपत गांभीर्याने घेतले जातात, हे एकंदरीतच प्रशासनाच्या या कृतीतून उघड झाले आहे.डोंबिवलीतील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात युवासेनेने आंदोलन छेडले होते. त्यानंतर, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनीही लाक्षणिक उपोषण छेडले होते. त्याचे पडसाद जूनमध्ये महासभेत उमटले होते. नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मांडलेल्या सभातहकुबीवर सर्वच नगरसेवकांनी अधिकाºयांच्या नाकर्तेपणावर झोड उठवली होती. चर्चेच्या वेळी प्रशासनावर हल्लाबोल करताना फेरीवालाप्रश्नी वारंवार सभा तहकुबी मांडली आहे. परंतु, कोणताच फरक पडलेला नाही, याकडे सर्वच नगरसेवकांनी लक्ष वेधले.फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामागे मोठे रॅकेट सक्रि य आहे. यात गावगुंड, पोलीस व महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी सहभागी असल्याचा आरोपही झाला होता. अतिक्रमणप्रकरणी जोपर्यंत अधिकारी निलंबित होत नाही, तोपर्यंत महासभा चालवू नका, अशी मागणी महापौरांकडे करण्यात आली. या वेळी ‘फ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत आणि पथकप्रमुख संजय कुमावत यांना वाहनचालकांकडून पैसे वसूल करून दिले जातात, असा गंभीर आरोपही करण्यात आला होता. संजय कुमावत हे १० ते १२ वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ तेथून हटवावे, अशी मागणीही करण्यात आली. त्याप्रमाणे त्यांना हटवण्याचे निर्देश महापौरांनी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना दिले होते. परंतु, या आदेशाची अंमलबजावणी करण्यास महापालिका प्रशासनाला चार महिने लागले. संजय कुमावत यांची ‘फ’ प्रभागातून उचलबांगडी करत शिक्षण विभागात नुकतीच बदली करण्यात आली.
कल्याण : संजय कुमावत यांची अखेर उचलबांगडी, भोंगळ कारभार : चार महिन्यांनी केली बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 1:40 AM