कल्याण : कल्याण-शीळ मार्गावरील वाहतूककोंडी महिनाभरात सोडवण्यात येईल, असे आश्वासन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांना मंगळवारी दिले.
कल्याण-शीळ मार्गावरील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी पाटील यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा केला.कल्याण-शीळ मार्गाने पनवेल, नवी मंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाताना वाहनचालक आणि प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागतो. शीळफाटा जंक्शन येथे उड्डाणपूल तयार करण्याचा प्रस्ताव पाटील यांनी यावेळी एमएमआरडीएच्या अधिकाºयांना दिला आहे. तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या बेकायदा बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. कल्याण ते म्हापेकडे जाणाºया पर्यायी टेकडीच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत, याकडे पाटील यांनी अधिकाºयांचे लक्ष वेधले. हे खड्डे येत्या मंगळवारपर्यंत बुजविण्याचे आश्वासन अधिकारी वर्गाने यावेळी दिले आहे.
वाहतूककोंडी कमी करण्यासाठी काही तात्कालिक व दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील, असे काळे यांनी सांगितले. दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये उड्डाणपूल तयार करणे, अंडरपास तयार करणे या उपाययोजनांचा समावेश आहे. तर तात्कालिक उपाययोजनांमध्ये जंक्शन मोठे करणे, लेफ्ट फ्री करणे, उघडे असलेले दुभाजक बंद करणे, रस्त्यातील पोल काढणे आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत. दीर्घकालीन उपाययोजनांना वेळ लागणार आहे. मात्र, तात्कालिक उपाययोजना महिन्याभरात करणे शक्य असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या पाहणी दौºयादरम्यान एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता जयवंत ढाणे, मोहन पाटील, एमएसआरडीसीचे अभियंता प्रशांत चाचरकर, ठाणे महापालिकेतील अभियंता रामदास शिंदे, कल्याण-डोंबिवलीचेमनसे गटनेते मंदार हळबे, हर्षद पाटील, राहुल कामत, मनोज घरत, विनोद पाटील, तुषार पाटील, संतोष म्हात्रे, शरद पाटील आदी उपस्थित होते.