ठाणे : मागील दोन वेळेस नवी मुंबईतून बाहेर पडलेल्या त्या १४ गावांतील रहिवाशांनी आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार भंडार्ली, तसेच आसपासच्या १४ गावांचा नवी मुंबईत समावेश करण्याबाबत नगरविकास खात्यामार्फत सर्व तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शुक्रवारी नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
भंडार्ली डंपिंगच्या मुद्द्यावरून शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात येथील गावकऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळेस येथील रहिवाशांना नवी मुंबई महापालिकेत १४ गावांचा समावेश करावा, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली. येथील दहिसर, निघु, मोकाशीपाडा, नावाळी, भंडार्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबर्ली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिसर मोरी आदी गावांचा यात समावेश आहे.
नवी मुंबई महापालिका नको म्हणून काही वर्षांपूर्वी अगदी हिंसाचाराचा मार्ग अवंलबिणाऱ्या ठाणे, नवी मुंबईच्या वेशीवर वसलेल्या १४ गावांमधील ग्रामस्थांना आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होण्याचे वेध लागले आहेत. वास्तविक, पाहता नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाली त्यावेळेस या गावांचा समावेश झाला होता. परंतु, आम्हाला महापालिका नको म्हणून येथील रहिवाशांनी विरोध करून बाहेर पडले होते. त्यानंतर पुन्हा या गावांचा समावेश नवी मुंबईत करण्यात आला होता. दोन वेळा समावेशानंतरही येथील रहिवाशांनी नाके मुरडली होती. आता मात्र नवी मुंबई महापालिकेत समावेशासाठी याच रहिवाशांनी आग्रही भूमिका घेतली आहे. राज्य सरकाराने आखलेल्या नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्रात (नैना) या गावांचा समावेश केल्याने पुन्हा एकदा येथील ग्रामस्थांचे पित्त खवळले होते. त्यानुसार आम्हाला महापालिकाच हवी, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.
कल्याण-तळोजा रस्त्यालगत आहेत गावेशीळफाटा भागातून उजवीकडे वळल्यास कल्याण-तळोजा रस्त्यालगत ही गावे वसली आहेत. ठाणे महापालिका हद्दीत शीळ, डायघर अशा गावांना अगदीच खेटून असून, ती भौगोलिकदृष्ट्या नवी मुंबईशी संलग्न नसली तरी महापालिका स्थापनेच्या वेळेस त्यांचा महापालिकेत समावेश झाला होता. परंतु, आता विकासकामे, समस्या सुटत नसल्याने या रहिवाशांनी पुन्हा महापालिकेत समावेशाची मागणी केली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेदेखील १४ गावे सर्व पक्षीय विकास समितीने हीच मागणी केली होती. त्यानंतर आता शुक्रवारी झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत ही मागणी केल्यानंतर शिंदे यांनीदेखील याला सकारात्मक प्रतिसाद देऊन या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.