- मुरलीधर भवार कल्याण - कल्याण डोंबिवलीतील रस्त्याच्या चरी भरण्याचे कामाकरीता ४५ कोटी रुपये खर्चाच्या निविदा मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र रस्त्यावरील चरी महापालिकेने नेमलेल्या कंत्राटदारांकडून भरल्या गेल्या नाही. त्या भरल्या असतील तर त्याचा पुरावा दाखवा असे आव्हान शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी महापालिका प्रशासनास दिले आहे.
महापालिका हद्दीत विविध टेलिका’म आणि मोबाईल कंपन्यांकडून सेवा वाहिन्या टाकण्याकरीता परवानगी घेतली जाते. या मोबाई कंपन्यांकडून महापालिाक रस्ते खोदकाची फी वसूल करते. या कंपन्या ज्या प्रमाणात रस्त्याचे खोदकाम करतात. त्या प्रमाणात महापालिकेच्या तिजोरीत फी भरली जाते. या विविध कंपन्याकडून वसूल करण्यात आलेल्या फिच्या किंमतीत रस्त्यावर पडलेली चरी आणि खोदलेला रस्ता पुन्हा बुजवून तो पूर्ववत करण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली जाते. महापालिकेने विविध कंत्राटदारांना ४५ कोटी रुपये खर्चाची कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वीच दिली आहे. या कामाच्या कंत्राट मिळविण्यावरुन कंत्राटदारांमध्ये वादही निर्माण झाला होता. त्यानंतर ही निविदा प्रक्रिया राबवून कामांचे वाटप करण्यात आले.
प्रत्यक्षात ४५ काेटी रुपये खर्चाची कामे देऊन देखील रस्त्यावरील चरी भरलेल्या नाहीत. केलेल्या कामाचे कंत्राटदाराने जियो टॅगिंग केले पाहिजे. काम करण्यापूर्वीचा कामाच्या ठिकाणचा फोटो आणि काम केल्यानंतरचा कामाच्या ठिकाणचा फोटो पाठविणे गरजेचे आहे. काम केल्याचे जियो टॅगिंग कुठेही दिसून येत नाही. महापालिकेने कंत्राटदारांना मोकाट सोडले आहे. त्यांच्याकडून ही कामे केली जात नाहीत. त्यामुळे ४५ कोटी रुपये कोणाच्या खिशात जाणार असा प्रश्न माजी नगरसेवक उगले यांनी उपस्थित केला आहे. कामे झाली असल्यास त्याचे पुरावे सादर करावे असे आव्हान त्यांनी महापालिका प्रशासनास दिले आहे. उगले यांच्या आव्हाना पश्चात महापालिका केलेल्या कामाचे पुरावे सादर करते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.