डोंबिवली : डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल अखेरीस रेल्वे प्रशासनाने कोणताही गाजावाजा न करता नागरिकांसाठी खुला केला. त्यामुळे पूर्व- पश्चिम नागरिकांची ये जा सुरू झाली आहे. सध्या सामान्य नागरिकांसाठी रेल्वेसेवा सुरू नसल्याने या पुलाच्या फलाटांना जोडणारे प्रवेश बंद ठेवण्यात आले आहेत. रामनगर दिशेकडील पुलासारखाच वापर प्रवासी करू शकत असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
१९८० च्या दशकात हा पादचारी पूल बांधण्यात आला होता. मात्र एल्फिन्स्टन स्थानकातील दुर्घटनेनंतर झालेल्या आॅडिटमध्ये हा पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या पुलावरून प्रवासी जाऊ नयेत अशी व्यवस्था करण्याची मागणी तत्कालीन राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यानुसार गेल्यावर्षी हा पूल रेल्वे अधिकाऱ्यांनी बंद केला. त्यानंतर काही काळात त्याचे पाडकाम करण्यात आले.
मध्यंतरी शहरातील दक्ष समितीने या पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत रेल्वे अभियंत्यांची भेट घेतली होती. त्यावेळी कामाला काहीसा वेग आला होता, मात्र कोरोनाच्या काळात पुन्हा काम मंदावले. त्यानंतर रेल्वे बंद असल्याने त्याचे काम तातडीने हाती घ्यावे आणि पूल पूर्ण करून तो खुला करावा यासाठी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने पाठपुरावा केला. अखेर क्रेन आणून गार्डर चढवले गेले आणि १५ आॅगस्टदरम्यान सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु तेही तांत्रिक कारणामुळे लांबले. अखेरीस सर्व चाचण्या केल्यानंतर तो खुला करण्यात आला. नव्या पूलाच्या उभारणीत तो ४.५ मीटरवरून ६ मीटर रुंद केला आहे.
नव्या पुलाच्या पूर्वेकडील पायºया जिथे उतरतात, तिथे काही पायºया या अडथळे आणणाºया असून त्याची डागडुजी करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजीव बिडवाडकर यांनी केली आहे. पुलावर चढताना लागणारी पहिली पायरी चढण्यास त्रासदायक आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी छोटा रॅम्प असणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. याबाबत पाहणी करून आवश्यक ती सुधारणा करण्यात येईल, असे रेल्वेच्या अभियंत्यांनी सांगितले.