डोंबिवली : कल्याण-तळोजा व्हाया डोंबिवली मेट्रो मार्गाचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीमार्गे कल्याण-शीळ-तळोजा मेट्रो मार्गाची सर्वप्रथम मागणी करून पाठपुरावा केला. २१ आॅक्टोबर २०१६ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन या मेट्रो मार्गाचे सविस्तर सादरीकरण त्यांनी केले होते.
कल्याण, डोंबिवली, २७ गावे, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसराच्या लोकसंख्येची आकडेवारी सादर करताना मेट्रोच्या कुठच्या मार्गाचा सर्वाधिक फायदा होईल याचे सादरीकरण केले होते. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मेट्रो मार्गाला हिरवा कंदील दाखवून डीपीआर तयार करण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले होते. त्यानुसार शिंदे यांनी एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची भेट घेतली होती. त्यांनी मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यासाठी दिल्ली मेट्रो कॉपोर्रेशनची नियुक्ती केली. या प्रयत्नांनंतर २१ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या मेट्रो मार्गाच्या डीपीआरला मंजुरी दिली होती. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळानेही २५ किमीच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी दिली होती. या मेट्रोचा मार्ग एपीएमसी मार्केट कल्याण, गणेशनगर, पिसवली गाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजेगाव, वडवली, बाळे गाव, वाकळण, तुर्भे, पिसवे डेपो, पिसवे, तळोजा असा आहे.