पनवेल : कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणारा आरोपी विशाल गवळी याने रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास तळोजा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे खळबळ उडाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डिसेंबर २०२४मध्ये कल्याणमध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या झाली होती. मुलीचा मृतदेह ठाणे ग्रामीणच्या पडघा येथील बापदेव गावाजवळ सापडला होता.
या प्रकरणी विशाल गवळी व त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली. विशालची १७ जानेवारी रोजी तळोजा कारागृहात रवानगी झाली. विशालच्या पार्थिवावर रात्री उशिरा विठ्ठलवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त होता.
काही दिवसांपासून धरला होता अबोला
विशाल काही दिवसांपासून तणावात होता. कारागृहातील सहकाऱ्यांसोबत त्याने अबोला धरला होता. बॅरेकमधील स्वच्छतागृहात रुमाल सदृश पांढऱ्या कपड्याच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला.
कल्याणमधील बलात्कार प्रकरण काय?
२३ डिसेंबर २०२४ रोजी पीडित मुलगी खाऊ आणण्यास घराबाहेर पडली. रात्र झाली तरी घरी परतली नाही. २४ डिसेंबरला तिचा मृतदेह आढळला. शवविच्छेदन अहवालात लैंगिक अत्याचारानंतर हत्या केल्याचे उघड झाले.