कल्याण - ब्रिटीशकालीन आणि धोकादायक अवस्थेतील रेल्वे पत्रीपूल पाडण्याचे काम आज केले जाणार आहे. या पाडकामाची तयारी पूर्ण झाली असून काही मिनिटांतच या ऑपरेशनला सुरुवात होणार आहे. या कामासाठी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत असा सहा तासांचा जम्बो ब्लॉक रेल्वे प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला असून या कालावधीत कल्याण डोंबिवली दरम्यान एकही लोकल धावणार नाही. या वाहतुकीचा ताण रस्ता वाहतुकीवर पडणार असल्याने सकाळपासूनच वाहतूक आणि शहर पोलीस, केडीएमटी आणि राज्य परिवहन या यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सीएसएमटीहुन कर्जतसाठी सकाळी ८.१६ वाजता लोकल रवाना करण्यात आली असून कल्याणहून सकाळी ९.०९ वाजता लोकल रवाना झाली आहे. सकाळी ९.३० वाजल्यानंतर कल्याण डोंबिवली दरम्यान एकही लोकल धावणार नाहीये. जूना पत्रीपूल शिस आणि लोखंड मिश्रित असून तो १२९ टन आहे.
अंधेरी येथील पूल दुर्घटनेनंतर या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले होते. यात हा पूल धोकादायक असल्याचे समोर आल्याने सप्टेंबरपासूनच या पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली होती, बाजूकडील केडीएमसीच्या उड्डाणपूलावरुन सद्यस्थितीला वाहतूक सुरू आहे. दरम्यान पत्रीपूलाचे पाडकाम बघण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बाजूकडील पूलावर झाली आहे. घटनास्थळी अग्निशमन विभाग तैनात ठेवण्यात आले आहे. काही मिनिटातच पत्रीपुलाच्या पाडकामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ७० अधिकारी, ४५० कर्मचारी यांच्या वतीने ही मोहीम पार पडणार आहे.
पुलावर ६० टनाचे दोन स्पॅन असुन ६०० टन क्षमतेची क्राऊल क्रेन पुर्वेकडील बाजुस तर पश्चिमेकडील बाजूस ४०० टन क्षमतेची क्राऊल क्रेन आहे. या क्रेनच्या व्यतिरिक्त २५० टनाची क्रेन आणि रेल्वेची १४० टनाची क्रेन आणण्यात आली आहे. पत्रीपुलाच्या खालून जाणाऱ्या मध्यरेल्वेच्या २५ हजार व्होल्टच्या वाहीन्या उतरविण्याचे कामाला सुरुवात झाली असून मुख्य पाडकामाला लवकरच प्रारंभ होणार आहे.