कल्याण : स्टेशन परिसरातील पश्चिमेतील स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे. या स्कायवॉकचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे काम केडीएमसीने आयआयटी संस्थेला दिले आहे. या कामासाठी १४ लाखांचा खर्च येणार आहे. आयआयटीकडून महिनाभरात आॅडिट रिपोर्ट मिळाल्यावर स्कायवॉक दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
कल्याण स्टेशन परिसरातील पश्चिमेला गर्दीतून पादचारी आणि प्रवाशांना थेट बाहेर पडता यावे, यासाठी स्कायवॉकची उभारणी केली. हा स्कायवॉक २००७ मध्ये मंजूर केला. महापालिका आणि एमएमआरडीए यांच्या मध्यस्थीने ८२ कोटी खर्च करून स्कायवॉक बांधला गेला. २०११ मध्ये हा स्कायवॉक पादचारी व प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. या स्कायवॉकची देखभाल-दुरुस्ती कोणी करायची, यावरून महापालिका आणि एमएमआरडीए यांच्यात वाद होता.
२०१४ मध्ये हा स्कायवॉक महापालिकेस हस्तांतरित करण्यात आला. स्कायवॉकला चार एण्ट्री पॉइंट आहेत. रेल्वेस्थानकाशी तीन ठिकाणी जोडलेला हा स्कायवॉक गुरुदेव हॉटेल, साधना हॉटेल, महात्मा फुले चौक, दीपक हॉटेलकडे उतरतो. या स्कायवॉकच्या पायऱ्या व रेलिंग तुटलेले आहेत. स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे बस्तान असते. स्कायवॉकला यापूर्वी दोन वेळा आग लागल्याची घटना झालेली आहे. तसेच एक पादचारी रेलिंग तुटलेली असल्याने स्कायवॉकवरून पडल्याची घटना घडली होती.
एल्फिन्स्टन पुलाची दुर्घटना व त्याच्या वर्षभरानंतर पुन्हा सीएसटी येथील हिमालय पादचारी पूल कोसळल्याची घटना घडल्याने रेल्वेकडून पुलाचे ऑडिट केले, तेव्हा विविध पूल धोकादायक असल्याचे उघड झाले. स्कायवॉक रेल्वेस्टेशनशी निगडित असला तरी महापालिकेच्या अखत्यारित येतो. त्यामुळे स्कायवॉकच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम आयआयटीकडे सोपवण्यात आले आहे.
यापूर्वी १५ लाखांचा खर्चमागच्या वर्षात कल्याण स्टेशन परिसरातील सोयीसुविधांचा भाजप खासदार कपिल पाटील व भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी पाहणी केली. त्यावेळी स्कायवॉकच्या दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला गेला. तेव्हा स्कायवॉकची दुरुस्ती तातडीने केली जाईल. गेल्या वर्षभरात देखभाल-दुरुस्तीच्या कामावर महापालिकेने १५ लाख खर्च केले. एवढा खर्च करूनही स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे.