कल्याण : पुणे येथे नुकत्याच झालेल्या मेडिक्वीन सौंदर्य स्पर्धेत कल्याणच्या डॉक्टर सीमा जाधव-शुक्ला आणि रेश्मा बनसोडे यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. सीमा यांनी टॅलेंट आणि लावणी नृत्य प्रकारात, तर रेश्मा यांनी वेशभूषा प्रकारात बाजी मारली आहे.
पुण्यातील हॉटेल आर्चिस येथे १३ ते १५ जुलैदरम्यान ही स्पर्धा झाली. पुण्यातील सुप्रसिद्ध डॉ. प्रेरणा बेरी कालेकर, मॅनेजिंग डायरेक्टर प्राजक्ता शहा, योगेश पवार यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. कोरोनाकाळात रुग्णांच्या सेवेत अहोरात्र वेळ देताना डॉक्टरांना उसंत मिळाली नाही. मेडिक्वीन स्पर्धेचे आयोजन २०२० मध्ये करण्यात येणार होते. मात्र, कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविले होते. १०० हून अधिक स्पर्धकांचे अर्ज प्राप्त झाले होते. सरकारच्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांनुसार ४० स्पर्धकांना प्रवेश देण्यात आला. वर्धा, कोल्हापूर, ठाणे, कल्याण येथून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षक समीर धर्माधिकारी होते. ४० स्पर्धकांमधून त्यांनी विजेत्यांची निवड केली. अनेक डॉक्टरांनी कोरोनाकाळातील त्यांचे अनुभव या स्पर्धेत व्यक्त केले.
-----------------