भिवंडी : शहराच्या सीमेबाहेरून वाहणारी कामवारी ही नदी नव्हे तर, नाला बनली आहे. ही नदी मृत झाली असून नदीला पुनर्जीवित करण्यासाठी स्थानिक प्रशासन व समाजाने तयारी केली पाहिजे. आई आजारी पडल्यानंतर तीवर इलाज मुलांनीच केला पाहिजे. त्यासाठी शहर व ग्रामिण भागातील नागरिकांनी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी भावनात्मक हाक जलपुरूष डॉ.राजेंद्रसिंग यांनी भिवंडीकरांना दिली आहे. ‘कामवारी नदी बचाव अभियान’ निमीत्ताने ते सोमवारी भिवंडीत आले होते.भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका व हालारी विशा ओसवाल कॉलेज आॅफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील नदी स्वच्छता प्रकल्प व जल व्यवस्थापन अंतर्गत कामवारी नदी बचाव अभियानासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेसाठी मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंग, मनपा आयुक्त मनोहर हिरे, यशदा संस्थेचे संचालक डॉ. सुमंत पांडे, संयोजक प्राचार्या डॉ. स्नेहल एस. दोंदे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी गैरहजर राहिल्याने तालुक्यातील महसूल विभागाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. त्यामुळे आयोजकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या कार्यशाळेत कामवारी नदीबाबतची चित्रफित दाखवून नदीचे विद्यमान स्वरूप दाखविण्यात आले. नदीच्या पुनर्जिवीतेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत उहापोह करण्यात आला. सायंकाळी या टीमने कामवारी नदीची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. राजेंद्र सिंग यांनी सांगितले की, मनपा प्रशासन व जिल्हा महसूल प्रशासन चांगल्या गोष्टी करते, पण काम करण्यावर भर देत नाही. कामवारी नदी पुनर्जीवित करण्यासाठी पाच कामे सुचविली आहेत. त्यानुसार कामवारी नदी जेथून वाहते त्या गावागावांत व शहरातील विद्यार्थ्यांमध्ये, तसेच नागरिकांमध्ये चेतना जागविली पाहिजे. ही त्यांची जबाबदारी असल्याचे पटवून दिले पाहिजे. त्यामध्ये शिक्षकांनादेखील सामावून घेतले पाहिजे.नदीची स्वच्छता करण्याची जबाबदारी शहरी प्रशासन व ग्रामिण प्रशासन एकमेकांवर ढकलत आहे. त्यामुळे कामवारी नदीची संसद बनवून एक आॅथॉरिटी बनली पाहिजे. नदीला कोणते आजार आहेत, हे शोधण्यासाठी व त्याची चिकीत्सा करण्यासाठी वैज्ञानिकांचा समुह कार्यरत केला पाहिजे. शहरी व ग्रामिण लोकप्रतिनीधींना वाटून जबाबदारी दिली पाहिजे. तसेच सर्व लोकांचा समावेश करून त्यांचे सामाजिक संस्थान बनविले पाहिजे. त्याचबरोबर नदीच्या सीमा नियमीत करून सीमांचे संरक्षण केले तर ही नदी पूर्ववत होणार आहे. हे काम आता सुरू झाले आहे,अशी माहिती डॉ. राजेंद्र सिंग यांनी दिली.
कामवारी नदी नव्हे, नाला बनली आहे!- जलपुरूष राजेंद्र सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:45 PM