भिवंडी: भिवंडी शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या कामवारी नदी पात्रात नजीकच्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील अनेक डाईंग कंपन्या केमिकलयुक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडत असल्याने या नदीतील पाणी दूषित होऊन तेथील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याची तक्रार जलनायक डॉ स्नेहल दोंदे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.
कामवारी नदी लगत महानगरपालिका क्षेत्रातील मलनिस्सारण प्रकल्पातील सांडपाणी देखील कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणूनबुजून डोळेझाक करीत आहे असा आरोप डॉ दोंदे यांनी केला आहे.या पूर्वी नदीपात्रात पाणी एका नाल्यातून वाहत जात होते परंतु नदीनाका येथे पूल बनविण्याचे काम सुरू असताना त्यादरम्यान एक स्वतंत्र सामायिक नाला हे सांडपाणी वाहून नदीपात्रात सोडण्यासाठी बनविण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात या नदीपात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणात होत असते.त्यामुळे नदीतील जलप्रदूषणामुळे त्याचे पावित्र्य राखले जाणार नाही त्यामुळे या नदीपात्रातील जलप्रदूषण रोखण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे .मध्यंतरी येथील जलप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करून तेथील उत्पादन बंद करण्यात आले होते परंतु आता या कंपन्या बिनदिक्कत सुरू कशा राहतात असा सवाल उपस्थित होत आहे.
दुसरीकडे भिवंडी तालुक्यात सरवली येथे एमआयडीसी असून येथून उल्हास नदीवाहत आहे.या उल्हास नदीत केमिकल,पेपर,कार्डबोर्ड,मिल्क व टेक्सटाईल उद्योग सर्रास पणे उल्हास नदी प्रदूषित करत असून प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबरच स्थानिक ग्रामपंचायतींचे देखील दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.