मीरारोड : कांदळवन होते तेथे नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात अत्यंत कमी नुकसान झाले आहे. कांदळवने ही चक्रीवादळ आणि सुनामी यांसारख्या नैसर्गिक संकटांमध्ये मानवासाठी ‘जैविक भिंत’ म्हणून काम करतात. समुद्रातील मासे अन्न, निवारा आणि प्रजननांसाठी कांदळवनात येतात. त्यामुळे मत्स्यव्यवसायाच्या दृष्टीनेही कांदळवने महत्त्वाची आहेत, असे मत मीरा राेड येथे झालेल्या कांदळवन कार्यशाळेत मान्यवरांनी व्यक्त केले.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या कांदळवन संरक्षण संवर्धनाबाबतच्या आदेशांचे काटेकोर पालन होऊन दाखल गुन्ह्यांचा तपास व आरोपींना शिक्षा व्हावी, शासकीय विभागांचा समन्वय असावा, कांदळवनचे महत्त्व व कायदेशीर बाबी जाणून घेण्याच्या अनुषंगाने मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कांदळवन संरक्षणासाठी ही राज्यातील पहिलीच कार्यशाळा मीरारोड येथील पोलीस आयुक्तालयातील संवाद सभागृहात पार पडली. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले.
कार्यशाळेची गरज व भविष्यात काम करताना सर्व शासकीय विभागाशी असणारा आवश्यक समन्वय याबाबत कार्यशाळेत विवेचन करण्यात आले. यावेळी आयुक्त दाते यांच्यासह अपर पोलीस आयुक्त एस. जयकुमार, कांदळवनचे विभागीय वन अधिकारी आदर्श रेड्डी, कांदळवन प्रतिष्ठानच्या प्रकल्प उपसंचालक शीतल पाचपांडे, वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद, सेवानिवृत्त वनअधिकारी राजेंद्र धोंगडे व ॲड. धीरज मिरजकर यांनी कांदळवनचे महत्त्व तसेच कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले. कांदळवन कक्षाचे आंजनेयुलू यांनी कांदळवन मॅपिंग कसे केले जाते याबाबत माहिती दिली. यावेळी सर्व पोलीस उपायुक्त, पोलीस अधिकारी, कांदळवन कक्ष, महापालिका व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कांदळवनाबाबत संविधानातील संरक्षण, सर्वोच्च व मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, विविध कायदे-नियम आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कांदळवनाचे संरक्षण ही घटनात्मक जबाबदारी
वातावरणातील कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणावर शोषून घेणे, जागतिक तापमानवाढ नियंत्रित करण्यास मदत करणे, समुद्र किनाऱ्याची धूप थांबविणे, जलप्रदूषण कमी करून घातक रसायने शोषून खाडी क्षेत्रास संरक्षण देणे, पाण्याची क्षारता शोषून घेणे आदी अनेक दृष्टीने कांदळवन महत्त्वपूर्ण आहेत. कांदळवनवर विविध मासे, पक्षी, प्राणी अवलंबून असल्याने त्याचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची घटनात्मक जबाबदारी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.