ठाणे : अभिनेत्री कंगणा रणौतला देशद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे आणि या देशातून तिची हाकालपट्टी केली पाहिजे. जोपर्यंत ती नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत तिला देशातून तडीपार केले पाहिजे असं जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मागणी केली आहे. स्वातंत्र्य चळवळीबाबत अभिनेत्री कंगना रणौतनं केलेल्या वादग्रस्त विधानामुळे देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहे.
गटई कामगार व दिव्यांगाच्या समस्या ऐकूण घेण्यासाठी कडू ठाण्यात रविवारी आले होते. त्यावेळी विश्रामगृहाबाहेर त्यांना पत्रकारांनी कंगना रणौतच्या वक्तव्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, स्वातंत्र्य सेनानींवर केलेल्या वक्तव्याविरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. तिच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. तिची या देशातून हाकालपट्टी केली पाहिजे. तिचा पुरस्कारही परत घेण्याची निश्चितच गरज आहे. पण या देशात तसे होत नाही. प्रत्येक गोष्टीवर राजकीय मुद्द करून त्याची पुन्हा खरी आणि खोटी बाजू असे निर्माण केले जाते, हे अत्यंत चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच गरीब कसा जगतो, शेतकऱ्यांचे काय हाल आहे, दिव्यांग बांधव कसा जगतो आदी मुळ मुद्दे या देशात आता कोसो दूर गेले आहेत. मंदिर, मस्जिद, कंगना हे असेच या देशात चालू राहणार आणि मुळ गोष्टीपासून आपण असेच दूर राहणार, असेही कडू यांनी सांगितले. त्रिपुराच्या घटनेविषयी विचारले असता ते म्हणाले की, एखाद्या राज्यात चांगलं घडलं म्हणजे सगळ्या देशात ते घडतं,असे होत नाही. पण वाईट घडले की ते सगळ्या देशभरात घडतं, असे या देशाचं दुर्दैव असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.