भिवंडी : कोणतीही निवडणूक राजकारणा शिवाय पूर्ण होत नाही मात्र शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत धनशक्तीचा वापर होत असल्यास ते दुर्दैवी असून शिक्षकीपेशा सारख्या पवित्र पेशा मध्ये निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्यास येणाऱ्या भावी पिढीसाठी चुकीचे आहे असे मत केंद्रीय पंचायतीराज राज्य मंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी भिवंडीत व्यक्त केले. ते या निवडणुकीत भिवंडी शहरातील दादासाहेब दांडेकर विद्यालयातील मतदान केंद्राठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी नंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार महेश चौघुले,भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी, शिवसेना शिंदे गटाचे मदनबुवा नाईक, प्रभूदास नाईक, सुमित पाटील यांसह भाजपा शिक्षक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीती नुसार प्रचार यंत्रणा राबविली असून उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मागील निवडणुकीतील पराभवा पासून या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करीत शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास पुढाकार घेतल्याने कोकण शिक्षक मतदारसंघघाच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास देखील यावेळी कपिल पाटील यांनी व्यक्त केला.