भिवंडी : देशाचा कारभार लोकाभिमुख असावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे व रायगड जिल्ह्यात सोमवारपासून १६ ते २० ऑगस्टपर्यंत पाच दिवसांची ‘जनआशीर्वाद यात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेत भाजपचे जिल्हास्तरीय व स्थानिक पातळीवरील नेतेही सहभागी होणार आहेत.
ठाणे जिल्ह्यातून पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्याचा बहुमान आगरी समाजातील खासदार कपिल पाटील यांना देण्यात आला. त्यानिमित्ताने जनआशीर्वाद घेण्यासाठी भाजप ही यात्रा काढणार आहे. ठाणे शहरातील आनंदनगर चेकनाक्याहून १६ ऑगस्टला यात्रेला सुरुवात हाेणार आहे. पहिल्या दिवशी ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व येथून यात्रा जाणार आहे. दुसऱ्या दिवशी १७ ऑगस्टला अलिबाग, रेवदंडा, पेण, पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातून यात्रा काढण्यात येईल. तिसऱ्या दिवशी १८ ऑगस्टला कल्याण शहर, शहाड, टिटवाळा, म्हारळ, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरातील विविध भागांतून यात्रा जाणार आहे. चौथ्या दिवशी १९ ऑगस्ट रोजी मुरबाड, किन्हवली, शहापूर, भिवंडी शहरातून ही यात्रा जाणार आहे. तर पाचव्या दिवशी २० ऑगस्टला भिवंडी तालुक्यात यात्रेची सांगता होईल. पाच दिवस तब्बल ४५१ किलाेमीटरचा प्रवास करणाऱ्या या यात्रेच्या दरम्यान संवाद साधून विविध योजनांचा आढावा पाटील घेणार आहेत.
विविध १७३ कार्यक्रम हाेणार
केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, एमआयडीसीतील जमीनमालकांबरोबर बैठक, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, गणेश मूर्तिकारांबरोबर बैठक, भूमिपुत्रांशी संवाद, स्वच्छता अभियान, दिव्यांग लाभार्थींशी चर्चा, भाजपचे समर्थ बूथ अभियान आदी कार्यक्रमांतही पाटील यांच्यासोबत भाजप नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या यात्रेदरम्यान १७३ विविध कार्यक्रम हाेणार आहेत.