डोंबिवली- पश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वेवरील कर्जत, कसारा आणि आसनगाव लोकलचे दरवाजे अडविणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे.
लोकलचे दरवाजे `ब्लॉक' करणाऱ्या प्रवाशांमुळे दूरच्या अंतरावरील प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरच राहावे लागत असल्याकडे रेल्वेमंत्र्यांचे खासदार पाटील यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले.
गेल्या काही वर्षांपासून कर्जत व कसारा मार्गावरील रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ झाली. मात्र, या मार्गावर लोकलची संख्या कमी आहे. लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. मात्र, सद्यस्थितीत काही प्रवाशी लोकलच्या दरवाजातच उभे राहत असल्यामुळे बहुसंख्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश करता येत नाही. त्यामुळे या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरच राहावे लागते. विशेषतः सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांचे अतोनात हाल होतात. त्यात त्यांचा नाहक वेळ जातो, असे खासदार पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
पश्चिम रेल्वेवर काही दिवसांपूर्वी दरवाजे `ब्लॉक' करणाऱ्या 22 महिला प्रवाशांवर रेल्वे पोलिस दलाच्या महिला कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. त्याच धर्तीवर मध्य रेल्वेवर कर्जत, कसारा आणि आसनगाव लोकलमध्ये दरवाजे अडविणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार पाटील यांनी केली आहे.