भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या वतीने केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांची उमेदवारी भाजपकडून बुधवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यावर विश्वास ठेवला असून पंतप्रधानांनी दाखविलेला विश्वास सार्थ करण्यासाठी भिवंडीत लोकसभा क्षेत्रातील मतदारांनी पुन्हा खासदार म्हणून संधी द्यावी, असे याआवाहन केंद्रीय राज्यमंत्री व भाजपाचे भिवंडी लोकसभेतील उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यामुळे मला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याबरोबरच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादामुळे उमेदवारी मिळाली. गेल्या ७७ वर्षांपैकी गेल्या १० वर्षांत भिवंडी लोकसभा मतदारसंघात विक्रमी ३५ हजार कोटी रुपयांची कामे झाली. अनेक कामे पूर्ण असून, काही प्रगतीपथावर आहेत. भविष्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा सुनियोजित पद्धतीने विकासाबरोबरच चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील राहीन अशी प्रतिक्रिया कपिल पाटील यांनी दिली आहे.