लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नववर्षाच्या स्वागतानिमित्त ३१ डिसेंबरला रंगणाऱ्या पार्ट्या, कार्यक्रमांना बगल देत कल्याणचे सुशांत करंदीकर (वय ४७) हे २० वर्षांपासून सायकलने गडकिल्ल्यांची सफर करत आहेत. आतापर्यंत त्यांनी १०० गडकिल्ले सायकलने सर केले आहेत. यंदा त्यांनी रायगड किल्ला सायकलने गाठला आहे. सुरुवातीला एकाकी असलेली ही अनोखी सफर अनेकांना सहभागी करून मोठी होत चालली आहे.
टिळक चौकात राहणाऱ्या करंदीकर यांनी १९८९ मध्ये दहावीला असताना प्रथम साध्या सायकलने कल्याण-भीमाशंकरची सफर केली. त्यानंतर त्यांना सायकल सफरीचा छंद लागला. १९९८ मध्ये त्यांनी एड्सच्या जागृतीसाठी सायकलने भारतभ्रमण केले. मुंबई-पुणे सायकल स्पर्धेत त्यांना पारितोषिक मिळाले. मात्र, स्पर्धेत गती तर, गडकिल्ल्यांवर सायकलने जाताना मानसिक व शारीरिक संतुलन महत्त्वाचे असते, असे ते म्हणाले.
सुरुवातीला साध्या सायकलने सफर करताना अडचणी येत असत. मात्र, आता आधुनिक सायकलींनी या मोहिमा करण्याचा छंदच करंदीकर यांना लागला आहे. ३१ डिसेंबरला काहीतरी वेगळे करण्याचा मानस त्यांनी उरी बाळगला. सगळ्य़ात प्रथम हरिश्चंद्र गडावर ते सायकलने गेले. सुरुवातीला एक गड ते सायकलने करत. मग दोन गड गाठू लागले. त्यात अनेकांना सहभागी करून घेऊ लागले. २५ वर्षांत १०० गडकिल्ल्यांची सफर सायकलने करण्याचे लक्ष्य त्यांचे होते. २०१० मध्ये त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील १६ गडकिल्ल्यांची सायकलने सफर केली. त्यामुळे २० वर्षांतच त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले.
दरम्यान, यंदाच्या रायगडावरील सायकल मोहिमेत करंदीकर यांच्यासोबत कृष्णा नाईक, दीपाली कंपाली, दैविक कंपाली, दिवाकर भाटवडेकर, वरद मराठे, चिन्मयी ढवळे, मन नाईक हे देखील सहभागी झाले होते. रायगड किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असल्याने गडावर सायकल नेता येत नाही. त्यामुळे जिथपर्यंत मुभा होती, तिथपर्यंत त्यांनी सायकलप्रवास केला.
‘२५० किल्ले सर करण्याचे लक्ष्य’वर्षाच्या सुरुवातीस मोहिमा न आखता वेळ मिळेल तशा वर्षभरात त्या पार पाडायच्या, असे करंदीकर यांचे मत आहे. आगामी काळात उर्वरित जवळपास २५० गडकिल्ल्यांची सायकल सफर त्यांना करायची आहे. वर्ष संपते तेव्हा, आपण नव्या वर्षात शरीर रिचार्ज व फिट कसे राहील, यासाठी या मोहिमा करीत असल्याचे ते म्हणाले.