लोकमत न्यूज नेटवर्क
कसारा : येथील घाटात निकृष्ट बांधकामामुळे अनेक ठिकाणी संरक्षक कठडे
तुटून पडले आहेत, तर काही कठडे दुचाकी, कार, ट्रकच्या धक्क्याने तुटले आहेत. दुरुस्तीच्या नावाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व त्यांनी नेमलेली ठेकेदार कंपनी अनेकदा दुरुस्तीच्या नावाखाली थातुरमातुर काम करून बिल काढण्याचे काम करत आहे. जुन्या कसारा घाटातून प्रवास करताना नागमोडी वळणाचा व कमकुवत संरक्षण कठड्याचा अंदाज नसल्याने आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत.
दोन वर्षांत संरक्षक कठडे तोडून ५ ते ७ वाहनांचा ४०० फूट खोल दरीत पडून अपघात झाला आहे.
३ जूनला जुन्या कसारा घाटात ऑईल घेऊन जाणारा ट्रक संरक्षक कठडे तोडून दरीत कोसळून एक गंभीर जखमी झाला, तर चालक ट्रकखाली दबल्याने त्याचा मृत्यू झाला. तुटलेले कठडे अपघातास कारणीभूत ठरणारे असून, नागमोडी वळणावर असलेल्या, तुटलेल्या कठड्यांमुळे रात्रीच्यावेळी अपघात होऊन वाहने दरीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तुटलेल्या कठड्याभोवती प्रशासनाने प्लास्टिक बॅरिकेट्स लावले असून, ते रात्री अंधारात व दाट धुक्यात वाहनचालकांना दिसत नाहीत.
सुरक्षेच्या कारणास्तव वर्षभर पाठपुरावा
राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या, प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील धोकादायक समस्यांबाबत महामार्ग पोलीस, घोटी केंद्र व कसारा पोलिसांनी संबंधित प्रशासनाकडे अनेकदा लेखी तक्रारी करून त्यावर उपाययोजना करण्याची विनंती केली. परंतु टोल कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व्यवस्थापनाकडून पोलिसांच्या पत्राला केराची टोपली दाखवली गेली आहे.
घाटातील धोकादायक ठिकाणे
जुन्या कसारा घाटातील साईबाबा खिंड, आबापॉईंट, हिवाळा ब्रिज वळण व त्यापुढील दोन किलोमीटरचा रस्ता तसेच नवीन घाटातील बिबलवाडी वळण, ब्रेक फेल पॉईंट, धबधबा पॉईंट, लतीफवाडी उतार, ओहळाची वाडी ही ठिकाणे धोकादायक आहेत. या धोक्याच्या ठिकाणी ब्लिंकर लाईट, तुटलेल्या कठड्याजवळ तात्पुरते रेडियम बॅरिकेट्स लावल्यास वाहनचालकांना सोयीचे ठरू शकेल.