नाशिक : गुरूवारी (दि.२५) भरदिवसा आठ ते दहा अपार्टमेंटच्या परिसरात घुसून मंगलमुर्तीनगर नाशिकरोड भागात वीस ते पंचवीस हल्लेखोरांनी गोळीबार करत व शस्त्राने वार करून कसारा येथील दहावीचा विद्यार्थी तुषार भास्कर साबळे याची निघृण हत्त्या केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील चौघा संशयितांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.कसारा येथून सुटीमध्ये आपल्या आत्याकडे आलेल्या तुषारवर अचानकपणे झालेल्या हल्ल्याने सर्वच जण चक्रावले होते; मात्र या हल्ल्याचे धक्कादायक कारण पोलीस तपासात समोर आल्याने सर्वांना आश्चर्यचकि त केले. तुषारच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपुर्वी पंचवटीमध्ये झालेल्या किरण निकमच्या खूनाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. निकम खून प्रकरणातील फरार संशयित बंड्या मुर्तडक हा मंगलमूर्तीनगरात राहत असल्याची माहिती निकमचा भाऊ शेखर निकमला मिळाली होती. त्यानुसार निकम याने मंगलमूर्तीनगरमधील हर्ष सोसायटीचे वाहनतळ गाठले. यावेळी येथे बसलेल्या तुषारचा चेहऱ्याचे साधर्म्य बंड्याच्या चेहऱ्याशी जुळत असल्याने हल्लेखोर निकम व त्याच्या साथीदारांनी त्याला लक्ष्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय आत्माराम अहिरे (२२), अमोल विष्णू गांगुर्डे (२६), करण राजू लोट (२१) नितीन किरण पवार (१९) यांना अटक केली आहे. त्यांच्या उर्वरित साथीदार व या गुन्ह्याचा म्होरक्या शेखर निकमचा पोलीस शोध घेत आहेत. तुषारवर गोळी झाडून प्रथम जखमी केल्यानंतर पुन्हा धारधार शस्त्राने हल्लेखोरांनी हल्ला चढविला होता.
कसाऱ्याच्या विद्यार्थ्याची हत्त्या; चौघांना पोलीस कोठडी
By admin | Published: May 27, 2017 2:18 PM