भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी काही वर्षांपूर्वी काशीगाव येथे दुमजली इमारत बांधली. तिच्या तळ मजल्यावर बाजार सुरू होणार असतानाच फेरीवाल्यांनी तेथे जाण्यास नकार दिला. त्यामुळे अनेक वर्षांपासून ओसाड पडलेला हा बाजार सध्या मद्यपींचा अड्डा झाला आहे.शहरात चार वर्षांपूर्वी पाच हजार फेरीवाले होते. सध्या त्यांची संख्या हजारोंच्या पटीने वाढली आहे. दरम्यान, या फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेने भार्इंदर पश्चिमेकडील मॅक्सस मॉलमागे कस्तुरी गार्डन रोडवर तसेच काशीगाव येथील सिल्व्हर सरिता गृहसंकुलासमोर एक व दोन मजली इमारती बांधल्या. या इमारतींच्या तळ मजल्यावर फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा हेतू होता. परंतु, त्यात व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांनी नकार दिला.भार्इंदर येथील इमारतीत स्थानिक संस्था कराचे मुख्यालय थाटण्यात आले व काशीगाव येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बेघरांसाठी रात्रनिवारा सुरू केला. रात्रनिवाऱ्यात मूळ लाभार्थी वंचित राहू लागले. याखेरीज, एका लघुचित्रपट दिग्दर्शकाने तेथेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने रात्रनिवारा बंद केला. दोन वर्षे ही इमारत ओसाड पडली होती. स्थानिक संस्था कर बंद झाल्यानंतरही भार्इंदर पश्चिमेकडील इमारतीत अद्याप फेरीवाल्यांना सामावून घेतलेले नाही. तूर्तास इमारतीबाहेर दररविवारी शेतकºयांना बाजार लावण्यासाठी मुभा दिली आहे.काशीगाव इमारतीत रात्रनिवारा सुरू नसला, तरी त्याच्या तळ मजल्यावर पालिकेने खाजगी सुरक्षारक्षकांचा निवारा मात्र सुरू केल्याचे दिसून येते. हे सुरक्षारक्षक पालिकेला कंत्राटी सेवा देत असून त्यांच्या निवाºयाची जबाबदारी पालिकेची नाही. ती कंत्राटदाराची असतानाही पालिकेने त्या इमारतीच्या तळ मजल्यावर खाजगी सुरक्षारक्षकांना राहण्याची सोय केली आहे.रात्री मद्याची पार्टी झोडली जाते. पार्टी संपल्यानंतर मद्याने भरलेले ग्लास, खाद्यपदार्थ व बाटल्यांचे वेष्टन तेथेच टाकण्यात येतात.पालिका इमारतीत मद्यपींचा धिंगाणा चालत असल्याच्या तक्रारी अनेकदा प्रशासनाकडे करूनही त्याला अद्याप आळा बसलेला नाही. यामुळे आसपासच्या रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने हा प्रकार त्वरित बंद करावा.- अरुण सातपुते, रहिवासीइमारतीत रात्री मद्यपी येत असल्याची तसेच खाजगी सुरक्षारक्षक बेकायदा तेथे राहत असल्याबाबत आस्थापना विभागाकडे तीनवेळा पत्रव्यवहार केला आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणली जाणार आहे.- दीपक खांबित, कार्यकारी अभियंता
काशीगावचा ओसाड बाजार बनला मद्यपींचा अड्डा , पालिकेचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 2:23 AM