मीरारोड - काशीमीरा पोलिसांनी दोघा सराईत वाहन चोरांना बेड्या ठोकत त्यांच्या कडून २ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करत ६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत शुक्रवार २२ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली.
सहायक पोलिस आयुक्त विलास सानप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, पोलीस निरीक्षक विजय पवार व जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र भामरे व प्रशांत गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक जावेद मुल्ला व पथकाने वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत निंकू सिसोदिया (२०) व रोहित भट (२१) यांना १५ रोजी अटक केली.
आरोपीची कसून चौकशी केली असता काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत ३ ; नयानगर पोलीस ठाणे हद्दीत २ आणि दहिसर पोलीस ठाणे हद्दीत १ असे ६ गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्यांच्या कडून चोरलेल्या ३ दुचाकी, ५ मोबाईल , २ हजार रोख रक्कम, ४७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, चोरीसाठीची मास्टर चावी असा २ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.