राजू काळे, भार्इंदर१२ लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरात वाहनांची संख्याही वाढत आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी शहरातील वाहतूक शाखा तोकडी पडत असल्याचे वृत्त ११ मे रोजी लोकमत अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावर, काँग्रेसचे आ. मुझफ्फर हुसेन यांनी चालू पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाने २०१४ मध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांसाठी मंजूर केलेल्या पदांपैकी १०० पदे वाहतूक शाखेची भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल्याने काशिमीरा वाहतूक शाखेच्या तोकड्या व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.सुमारे ५ हजारांहून अधिक असलेल्या शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवणाऱ्या काशिमीरा वाहतूक शाखेकडे तोकडे मनुष्यबळ आहे. त्यात १ वरिष्ठ वाहतूक निरीक्षकासह १ निरीक्षक, १ उपनिरीक्षक व ९३ कर्मचाऱ्यांचा समावेश असला तरी त्यातील सुमारे ४० कर्मचारी प्रतिनियुक्तीवर, सुमारे २० ते २१ कर्मचारी हक्काच्या रजेसह साप्ताहिक सुटीमुळे अनुपस्थित असतात. उर्वरित ३५ कर्मचाऱ्यांना शहरातील ३० वाहतुकीचे पॉइंट सांभाळावे लागतात. प्रत्येक पॉइंटवर दोन ते तीन वाहतूक कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे ठरते. नो-पार्किंग झोनमधील वाहनांवर दैनंदिन कारवाईसह वाहनांची जप्त करण्यात आलेली कागदपत्रे दंड भरल्यानंतर परत करणे, जप्त करण्यात आलेल्या वाहनांची नोंदणी व ती पुढील कार्यवाहीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे वर्ग करण्याच्या लेखनिक कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती अनिवार्य असताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी इतर आवश्यक ठिकाणी कर्मचारीच उपलब्ध नाहीत. पालिकेने त्यांच्या सहकार्यासाठी स्वखर्चातून ४० वॉर्डनची नियुक्ती केली आहे. त्याचे वृत्त लोकमतमध्ये ११ मे रोजी प्रसिद्ध केले होते. त्यावर, आ. मुझफ्फर यांनी वाहतूक शाखेत आवश्यक मनुष्यबळाची मागणी केली होती. त्यावर, मुख्यमंत्र्यांनी मार्च २०१४ च्या निर्णयानुसार ठाणे ग्रामीण पोलिसांसाठी ४५२ पदे निर्माण केल्याचे सांगून त्यातील १०० पदे वाहतूक शाखेला देण्याचे स्पष्ट केले.
काशिमीरा वाहतूक शाखेला मिळणार १०० जणांचे मनुष्यबळ
By admin | Published: August 04, 2015 3:15 AM