मीरारोड ( ठाणे ) - मीरा भाईंदर महापालिका एकीकडे बेकायदा व धोकादायक ठरणाऱ्या हातगाड्या - फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई न करता पाठीशी घालत असताना दुसरीकडे काशीमीरा पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गॅस शेगडी पेटवून लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या ६ हातगाडी वाल्यांवर गुन्हे दाखल केले आहेत .
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्या निर्देशा नुसार पोलिसांनी गुरुवारी काशीमीरा नाका येथे लव्हली रेस्टोरेंट समोर सार्वजनिक रस्त्यावर कबाब पाव ची गाडी लावणाऱ्या मोहम्मद रुकसाद अशफाक ( १९ ) व आम्लेट पाव ची गाडी लावणाऱ्या मोहम्मद शाईन खान ( ४० ) ह्या दोघांवर तसेच लकी देशीबार समोर अंडापावची गाडी लावणाऱ्या मोहम्मद दानिश जुनेल शेख ( २७ ) ह्या तिघांवर तसेच ठाकूर मॉल जवळ रस्त्यावर अंडापावची गाडी लावणारे रवींद्र मांडवकर ( ४९ ) ; पावभाजीची गाडी लावणाऱ्या आशिष गुप्ता ( ३३ ) पाणीपुरीची गाडी लावणारा कृष्णकांत गुप्ता ( ४१ ) ह्या तिघांवर ६ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत . ह्या सहा जणांनी सार्वजनिक ठिकाणी जाणीवपूर्वक हयगय करत गॅस सिलेंडरचा वापर करून गॅस शेगडी पेटवत आजूबाजूने जाणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला. भादंवि च्या कलम २८५ प्रमाणे गुन्हे दाखल केले असून त्यांचे गॅस सिलेंडर व गॅस शेगड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत .