ठाणे : खंडणीप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याच्या दोन साथीदारांना शनिवारी ठाणे जिल्हा विशेष न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, तर कासकर आणि इतर तिघांविरोधात मकोकांतर्गत कारवाई केली असून, त्या चौघांना दिवाळीनंतर पुन्हा लगेच अटक करणार असल्याचे आणि ठाण्यातील एका नगरसेवकासह एका नगरसेविकेच्या पतीलाही चौकशीस बोलाविणार असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.कासकर आणि त्याच्या दोन साथीदारांना ठाणे खंडणीविरोधी पथकाने ३ आॅक्टोबर रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यातील खंडणीच्या एका गुन्ह्यात अटक केली होती. या गुन्ह्यात त्यांना दोन वेळा पोलीस कोठडी मिळाली होती. शनिवारी त्यांना ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. चव्हाण यांच्या न्यायालयात हजर केले. त्या वेळी पोलिसांनी तिघांना तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. मात्र, न्यायालयाने पोलीस कोठडीऐवजी तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार, त्यांची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात केली आहे.रवी पुजारीच्या हस्तकांच्या कोठडीत वाढ कासारवडवलीतील बिल्डरने खंडणी न दिल्याने, त्याच्या कार्यालयावर गोळीबारासाठी आलेल्या रवी पुजारींच्या दिनेश राय आणि नितीन राय या हस्तकांना अटक केली आहे. त्या दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ झाली असून, त्यांना शुक्रवारी ठाणे न्यायालयाने १८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.आतापर्यंत ३१ तोळ्यांचे दागिने हस्तगतठाणेनगर पोलीस ठाण्यात खंडणीच्या गुन्ह्यातील विकलेले ४० तोळे दागिन्यांपैकी ३१ तोळ्यांचे दागिने ठाणे खंडणीविरोधी पथकाने हस्तगत केले आहेत.यामध्ये ठाण्यातील माजिवडा येथील ज्वेलर्सदाराकडून ७ तोळे, माहिमच्या ज्वेलर्सदाराकडून २० तोळे आणि मुलुंडमधील एका बारबालेकडून ४ तोळे असे ३१ तोळे हस्तगत केले आहे.त्या बारबालेला मुमताज याने हे दागिने दिले होते. उर्वरित दागिनेही लवकरच हस्तगत करण्यात येतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.विकत घेतलेल्या मालमत्तेचा शोधकासकरने गोवा, रत्नागिरी, तसेच मुंबईत काही मालमत्ता खरेदी केली असल्याची बाब पुढे आली आहे. त्या मालमत्तेचाही शोध सुरू असून, तसेच कासकरच्या बँक खात्याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कासकर खंडणी प्रकरण : नगरसेवक पती-पत्नीची दिवाळीनंतर चौकशी; गोवा, रत्नागिरीसह मुंबईतील मालमत्तेचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:37 AM