अंबरनाथ : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अंबरनाथ तहसील कार्यालयाबाहेर शनिवारी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
राज्यात आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आता शिक्षक संघटनेने पदोन्नतीच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू केले आहे. अंबरनाथ कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने अध्यक्ष आनंद सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न अद्यापही सरकारने सोडवला नसून, या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. तसेच पदोन्नतीच्या कोट्यातील आरक्षित पदे रिक्त ठेवून खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे सेवा ज्येष्ठतेने भरण्याचे आदेश दिल्याने त्यालाही विरोध करण्यात आला आहे. या निर्णयाला देखील संघटनेने विरोध दर्शवला आहे. मागासवर्गीय कर्मचारी शिक्षक व अधिकारी यांची पदोन्नती व प्रतिनिधित्व किती आहे याची माहिती सर्वोच्च न्यायालयात लवकरात लवकर सादर करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागण्यांव्यतिरिक्त इतर मागण्यांसाठी हे आंदोलन केल्याचे सोनकांबळे यांनी सांगितले.