डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेने २७ गावांमधील पी अॅण्ड टी कॉलनी आणि सागावमधील एकूण १५ इमारतींच्या १९ बेकायदा नळजोडण्यांवर शनिवारी पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. त्याचबरोबर पी अॅण्ड टी मधील बेकायदा बांधकामांवरही हातोडा चालवण्यात आला. केडीएमसीतील २७ गावे ‘ई’ प्रभागांतर्गत येतात. या २७ गावांत बेकायदा बहुमजली इमारती उभारल्या जात आहेत. या इमारती उभारणारे बिल्डर नागरिकांचे पिण्याचे पाणी पळवून त्याचा वापर बांधकामासाठी करत आहेत, असा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला होता. भाजपा नगरसेविका रवीना माळी यांनी, तर महापालिकेच्या मुख्यालयावर हंडा-कळशी मोर्चा काढला होता. बेकायदा नळजोडण्यांबरोबर बेकायदा बांधकामांवर महासभेत वारंवार चर्चा झाली होती. या वेळी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी कडक मोहीम राबवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार, ई प्रभाग अधिकाऱ्यांनी बेकायदा नळजोडण्या तोडण्याची कारवाई हाती घेतली आहे. प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी पोलीस बंदोबस्तात सागाव गाठले. या पथकाने ‘शिरीन’, ‘पंचवटी’, ‘अंजनी’, ‘श्री बालाजी’, ‘बालाजी प्राइड’, ‘सुनीता अपार्टमेंट’ या इमारतींचा पाणीपुरवठा खंडित केला. काही इमारतींनी मालमत्ताकर थकवला आहे. तर, कारवाई केलेल्या सर्वच इमारतींच्या पाणीजोडण्यांना मोटारी बसवल्या होत्या. या मोटारींद्वारे जास्तीचे पाणी खेचले जात होते. त्यामुळे अधिकृत जोडणी असलेल्या इमारतींचा पाणीपुरवठा अनियमित झाला होता. याची दखल घेत कारवाई पथकाने पाणी खेचणाऱ्या पाच मोटारी जप्त केल्या. खेरानगर, रविकिरण सोसायटी, हनुमान मंदिरामागील परिसरात इमारतींच्या नळजोडण्याही खंडित करण्यात आल्या. उपअभियंता योगेंद्र राठोड, कनिष्ठ अभियंता देवेंद्र एकांडे यांनीही कारवाई केली. ही मोहीम ४ एप्रिलपर्यंत राबवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
केडीएमसीने बेकायदा नळजोडण्या तोडल्या
By admin | Published: April 01, 2017 11:34 PM