कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सफाई कामगार काम न करताच फुकटचा पगार लाटत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली जाणार असल्याचा सज्जड इशारा मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे. त्यामुळे बिनकामाचा पगार घेणाऱ्या कामगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.केडीएमसीची ऑनलाइन महासभा काही दिवसांपूर्वी झाली. त्यात सर्वपक्षीय सदस्यांनी शहरांतील कचरा नियमित उचलला जात नाही. मनपाच्या १० पैकी चार प्रभाग क्षेत्रांत खाजगी कंपनीला कचरा उचलण्याचे कंत्राट दिले आहे. मात्र, कंत्राटदाराकडून कचरा उचलला जात नाही. त्याच्या कामात अनियमितता आहे. या सगळ्य़ा तक्रारी सदस्यांनी केल्यावर त्यावर एक संयुक्त बैठक घेतली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार स्थायी समिती दालनात गुरुवारी बैठक घेण्यात आली. या वेळी महापौर विनीता राणे, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, भाजप गटनेते शैलेश धात्रक, विरोधी पक्षनेते राहुल दामले आदींसह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे उपस्थित होते. जे कामगार कामावर हजर न राहता हजेरी लावतात. जे महापालिकेचा फुकट पगार लाटतात, त्यांच्याविरोधात धडक मोहीम सुरू केली जाईल. अचानक हजेरी शेडला भेटी देऊन त्यांचा शोध घेतला जाईल. प्रत्येक प्रभागांत दोन अतिरिक्त घंटागाड्या देणार कंत्राटदाराला अनियमितताप्रकरणी दंड आकारला जात आहे. महापालिका हद्दीत कचरा उचलण्यासाठी १३० घंटागाड्या आहेत. ४३ आरसी व्हॅन आहेत. १० डम्पर आहेत. तरीही काही ठिकाणी कचरागाड्या कमी पडत आहेत. काही प्रभाग आकाराने मोठे आहेत. ही बाब लक्षात घेता प्रत्येक प्रभागांत अतिरिक्त दोन घंटागाड्या वाढवून दिल्या जाणार आहेत.
फुकटचा पगार घेणाऱ्या कामगारांची खैर नाही, केडीएमसी आयुक्तांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 1:04 AM