कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले होते. परंतु, त्याविरोधात व्यापाऱ्यांनी केलेले आंदोलन पाहता आयुक्तांनी ‘यू’ टर्न घेत गुरुवारी सुधारित आदेश जारी केला. यात फेरीवाले, हातगाडीविक्रेते यांना शनिवार आणि रविवारी विक्री करण्यावर घातलेली बंदी कायम ठेवली असताना व्यापाऱ्यांना मात्र या दोन्ही दिवशी दुकाने चालू ठेवण्यास सूट मिळाली आहे. दरम्यान, दररोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत दुकाने चालू ठेवण्याचा आदेश मात्र कायम ठेवण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरुवारीही ८९८ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा हा प्रादुर्भाव पाहता सूर्यवंशी यांनी नागरिकांची गर्दी टाळावी, या उद्देशाने अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवारी दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. त्याविरोधात व्यापाऱ्यांनी डोंबिवलीत ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केले होते. यात व्यापाऱ्यांना राजकीय पाठबळ मिळाल्याने आयुक्तांना त्यांचा निर्णय माघारी घ्यावा लागल्याची चर्चा सुधारित आदेशावरून सुरू झाली आहे.
आयुक्तांनी शनिवार आणि रविवारी दुकानदारांना व्यवसाय करण्यास मुभा देताना मागील काही निर्णय मात्र जैसे थे ठेवले आहे. शुक्रवारपासून मनपा क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना दररोज सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारचे फेरीवाले, हातगाडी विक्रेते यांना दर शनिवारी व रविवारी बसण्यास व विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. भाजी मंडई शनिवारी व रविवारी ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, पोळी-भाजी केंद्रे रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील. तथापि, या वेळेत घरपोच सुविधा सुरू राहतील, असे सुधारित आदेशात नमूद केले आहे.
आम्हालाही पोट आहे, मग दुजाभाव का!
आयुक्तांनी काढलेल्या सुधारित आदेशावर फेरीवाल्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांनी आंदोलन केल्याने तसेच त्यांना राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांना शनिवार आणि रविवारी व्यवसाय करण्यास परवानगी दिली गेली आहे. त्यांच्याप्रमाणे आम्हालाही पोट आहे. त्यामुळे आता आम्हीदेखील रस्त्यावर उतरून न्यायासाठी आंदोलन करायचे का, असा सवाल डोंबिवली शहरातील फेरीवाल्यांचे नेते बबन कांबळे यांनी केला आहे.
------------