डोंबिवली - केडीएमसीच्या हद्दीत इनमीन दोन नाट्यगृह असून त्याची देखभाल महापालिका प्रशासनाला करता येत नाही, कारण तशी इच्छाशक्तीच त्यांच्याकडे नाही. जे अधिकारी प्रशासनात विविध पदांवर आहेत त्यांच्या पदव्या तपासल्या की समजेल त्यांचे ज्ञान किती आहे ते? कोणालाही कुठलेही पद केवळ सेवाज्येष्ठता तत्वावर दिले गेल्यानेच शहरांची दुर्दशा झाली असल्याची टिका प्रख्यात वास्तुविशारद राजीव तायशेटे यांनी केली.तायशेटे डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे वास्तुविशारद आहेत. दोन दिवसांपासून लोकमतच्या हॅलो ठाणेमधील सांस्कृतिक ठणठणाट या शिर्षकाखाली आलेल्या वृत्तांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ज्या पद्धतीने नाट्यगृह प्रशासनाची पोलखोल केली आहे ती योग्य असून अधिका-यांना नाट्यगृह चालवायचेच नसल्याचे ते म्हणाले. शुभारंभापासून जर इतिहास बघितला तर हे नाट्यगृह सुरु करण्यासाठी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी हातभार लावुनही चार आयुक्त बदलल्यानंतर प्रकल्प मार्गी लागला. इथल्या अधिका-यांना सुखवास्तु करदात्यांना द्यायच्या म्हंटल्या की अंगावर येते, म्हणुनच २२ वर्षांच्या कालावधीत अवघी दोन मनोरंजनाची सांस्कृतिक केंद्र महापालिका तयार करु शकली ही या महापालिकेची शोकांतिका आहे.कोणत्याही प्रकल्पासाठी आपात्कालीन निधी असतोच. तसा या प्रकल्पासाठी का नाही? नसेल तर तशी तरतूद का गेली नाही? असेल तर तो निधी कुठे गेला यासगळयाची चौकशी व्हावी असेही ते म्हणाले. एसीचे काम हे एकूण प्रकल्पाच्या ७ टक्केपण काम नाही. पण अन्य वास्तु धडधाकट आहे असे प्रशासन सांगू शकते का? चांगल्या वास्तुची अशी वाताहात होतांना बघवत नाही, दु:ख होते, माध्यमांनी पोलखोल करावीच असा टोला त्यांनी लगावला.
नाट्यगृह चालवण्याची केडीएमसीची इच्छाशक्तीच नाही, वास्तुविशारद राजीव तायशेटे यांची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 8:41 PM