कल्याण : केडीएमसीच्या परिवहन उपक्रमाचे सभापती संजय पावशे यांचा पदाचा कार्यकाळ बुधवारी संपल्याने लवकरच या पदासाठी निवडणूक होणार आहे. महापालिका सचिव संजय जाधव यांनी कोकण विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या पत्रावर त्यांनी निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची नेमणूक केली आहे. कल्याणकरांनी मात्र निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. परंतु, १२ मार्चच्या आत ही निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.परिवहन समितीत एकूण १३ सदस्य आहेत. पक्षीय बलाबल पाहता शिवसेना पाच, भाजपा सहा, मनसे आणि काँग्रेस प्रत्येकी एक अशी सदस्य संख्या आहे. पावशे यांचा कार्यकाल बुधवारी संपला. यंदा भाजपा सभापतीपदाचा दावेदार आहे. मात्र, सद्य:स्थितीत स्थायीचे सभापतीपद तसेच आगामी पदरात पडणारे महापौर आणि शिक्षण समिती सभापतीपद पाहता परिवहन सभापतीपद पुन्हा शिवसेनेकडे जाण्याचे संकेत आहेत.शिक्षण समिती मुदत १८ मार्चला संपणार -शिक्षण समितीची मुदत १८ मार्चला संपणार असल्याने तत्पूर्वी नवीन समिती स्थापन केली जाणार आहे. त्यामुळे कोणाची या समितीवर वर्णी लागते, याकडे लक्ष लागले आहे. यात तौलनिक संख्याबळाच्या आधारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वानुसार समितीवर सदस्य नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, नवीन सदस्य नियुक्ती प्रक्रिया होईल.शिक्षण मंडळाच्या बरखास्तीनंतर शिक्षण समिती उदयास आली. शिक्षण मंडळावर सदस्य नेमताना बाहेरील व्यक्तींना प्राधान्य दिले जाते, परंतु प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून पालिकेतील नगरसेवकांचीच या ११ सदस्यांच्या समितीवर वर्णी लावली जात आहे.शिक्षण मंडळाला पाच वर्षांचा कालावधी मिळायचा, परंतु शिक्षण समितीला एक वर्षाचाच कालावधी ठरवण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करताना झालेल्या वाटाघाटीत समितीचे पहिले सभापतीपद भाजपाच्या वाट्याला गेले होते. सध्या ते सेनेकडे आहे. पुन्हा ते भाजपाकडे जाणार आहे.
केडीएमसी : परिवहन समितीची निवडणूक लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 2:17 AM